आवाज घटला, विषारीपणा कायम!

आवाज घटला, विषारीपणा कायम!
Published on: 

आवाज घटला, विषारीपणा कायम!
आवाज फाउंडेशनचा दावा; ग्रीन क्रॅकर्समध्येही बेरियमचे अंश, काही पाकिटांवरील क्यूआर कोड बनावट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : फटाक्यांच्या आवाजावर नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या चाचण्या आणि जनजागृतीच्या प्रयत्नांना यश आले आहे. पूर्वी १४० डेसिबलपेक्षाही अधिक आवाज करणारे फटाके आता बहुतांश वेळा १२५ डेसिबलच्या कायदेशीर मर्यादेत आले आहेत, मात्र आवाजाची तीव्रता कमी झाली असली, तरी फटाक्यांमधून बाहेर पडणाऱ्या विषारी रसायनांचा धोका अद्याप कायम असल्याचा दावा आवाज फाउंडेशनने केला आहे.
आवाज फाउंडेशनने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) सहकार्याने ८ सप्टेंबर २००६ रोजी वडाळा ट्रक टर्मिनस येथे २१ प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेतली होती. या चाचणीत सर्वच फटाक्यांनी आवाजाची निर्धारित मर्यादा ओलांडली होती. त्यातील सर्वाधिक आवाज १४४.९ डेसिबल इतका नोंदविण्यात आला होता. त्यानंतर दरवर्षी फटाक्यांच्या आवाजाची चाचणी आणि जनजागृती सुरू ठेवण्यात आली. यामुळे फटाके उत्पादकांवरही कमी आवाजाचे फटाके तयार करण्यासाठी दबाव निर्माण झाला. परिणामी, फटाक्यांच्या आवाजात घट झाल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे, मात्र आवाज कमी होत असताना फटाक्यांमधील रासायनिक प्रदूषणाचा प्रश्न पुढे आला. त्यामुळे १० नोव्हेंबर २०१२ पासून आवाज फाउंडेशनने मुंबईतील बाजारपेठांमध्ये विकल्या जाणाऱ्या फटाक्यांमधील रसायने आणि जड धातूंच्या तपासणीला सुरुवात केली. गेल्या सुमारे १५ वर्षांच्या तपासणीत बंदी असलेल्या बेरियमसारख्या रसायनांचा वापर आढळल्याचा दावा संस्थेने केला आहे. विशेष म्हणजे, ‘ग्रीन क्रॅकर्स’ म्हणून विकल्या जाणाऱ्या काही फटाक्यांच्या पाकिटांमध्येही अशा रसायनांचे अंश आढळले असून, काही पाकिटांवरील क्यूआर कोड बनावट असल्याचेही संस्थेने निदर्शनास आणले आहे.

क्यूआर कोड तपासा
फटाके खरेदी करताना पाकिटावर रासायनिक घटकांची माहिती दिली आहे का, क्यूआर कोड अधिकृत आहे का आणि फटाके प्रत्यक्षात हरित फटाके आहेत का, याची खातरजमा करण्याचे आवाहन आवाज फाउंडेशनने केले आहे. केवळ आवाज कमी असलेला फटाका म्हणजे पर्यावरणासाठी सुरक्षित फटाका नव्हे, असा इशाराही संस्थेने दिला आहे. त्यामुळे आता ध्वनिप्रदूषणापाठोपाठ रासायनिक प्रदूषण रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

फटाक्यांचा आवाज कमी करण्यात यश आले असले, तरी त्यातील विषारी रसायनांचा धोका कायम आहे. कमी आवाजाचा फटाका म्हणजे पर्यावरणपूरक फटाका नव्हे. नागरिकांनी खरेदीपूर्वी फटाक्यांवरील रासायनिक घटकांची माहिती तपासावी.
- सुमैरा अब्दुलअली, प्रमुख, आवाज फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.