

दादरमध्ये दिवाळीची लगबग
रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत नागरिकांची खरेदीसाठी गर्दी
प्रभादेवी, ता. १ (बातमीदार) ः दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी दादरची बाजारपेठ नागरिकांच्या गर्दीने फुलून गेली होती. दिवाळीच्या खरेदीसाठी सकाळपासूनच नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.
दिवाळीनिमित्त नवीन कपडे, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, तोरणे, सजावटीच्या वस्तू, विद्युत रोषणाई, मिठाई तसेच फराळाचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती. विशेषतः कुटुंबांसह खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची संख्या मोठी होती. विविध प्रकारच्या आकर्षक वस्तूंनी दुकाने सजली होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांनीही विविध वस्तूंची मांडणी केली होती.
दादर म्हणजे सर्व प्रकारच्या खरेदीसाठी मध्यवर्ती ठिकाण. यामुळे रविवारची सुट्टी आणि दिवाळीच्या खरेदीचा उत्साह यामुळे दादरच्या प्रमुख रस्त्यांवर तसेच बाजारपेठेतील अंतर्गत मार्गांवर मोठी गर्दी झाली होती.
दादरमधील एन. सी. केळकर मार्ग, डिसिल्व्हा रोड, रानडे रोड, चितळे पथ कबुतरखाना, भवानी शंकर रोड या मार्गांवर विविध प्रकरच्या वस्तूंसाठी खरेदीची लगबग दिसून आली. गारमेंट व्यावसायिकांनी होलसेल दरात कपड्यांचा सेल लावल्यामुळे या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली.
दादरमधील कपड्यांची दुकाने, ज्वेलर्सची दुकाने, मिठाई, विविध प्रकारची सजावटीची दुकाने, रोषणाईच्या दुकानांत खरेदीची लगबग असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
काही ठिकाणी वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली. सणासुदीच्या खरेदीचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील गर्दीमुळे व्यापाऱ्यांमध्येही समाधानाची भावना होती.