

नवी मुंबईत ‘हिरकणी महोत्सवा’चे उत्साहात उद्घाटन
महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ ः पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित चारदिवसीय ‘हिरकणी महोत्सवा’चे उद्घाटन करावे-नेरूळ येथील गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदानावर उत्साहात झाले. या उपक्रमाचे वनमंत्री गणेश नाईक, महापौर सुजाता पाटील, सभागृह नेते सागर नाईक आणि महिला व बालकल्याण समिती सभापती सलुजा सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन झाले.
महिला बचत गटांच्या कल्पकतेला आणि दर्जेदार उत्पादनांना व्यासपीठ देणाऱ्या या महोत्सवाची संकल्पना स्तुत्य असल्याचे सांगत गणेश नाईक यांनी पालिकेचे कौतुक केले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशी प्रदर्शने वर्षातून किमान तीनदा, नवी मुंबईच्या वेगवेगळ्या भागांत सात-सात दिवसांसाठी आयोजित केली जावीत, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. याप्रसंगी वनमंत्र्यांनी स्वतः विविध स्टॉल्सला भेटी देऊन वस्तूंची खरेदी केली आणि महिला उद्योजकांचा उत्साह द्विगुणित केला. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवाला नवी मुंबईकरांनी पहिल्याच दिवसापासून अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे.
कपडे, उटणे व साड्यांची पर्वणी
प्रारंभी १५० स्टॉल्सचे नियोजन असताना, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून तब्बल २७५ हून अधिक स्टॉल्सची व्यवस्था करण्यात आली. यात सुवासिक उटणे, पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या, गृहसजावटीच्या वस्तू, आकर्षक साड्या, डिझायनर कपडे आणि दागिन्यांचा समावेश आहे. तसेच, महिलांनी घरगुती पद्धतीने तयार केलेला चवदार दिवाळी फराळ आणि खवय्यांसाठी २१ खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हे विशेष आकर्षण ठरत आहेत. ईटीसी दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी बनवलेल्या वस्तूंचा स्टॉलही या प्रदर्शनात केंद्रबिंदू ठरला आहे.
महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम
या आनंदोत्सवात सामाजिक भान जपत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक विशेष मदतनिधी पेटी ठेवण्यात आली. त्यातील निधी मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त मदतनिधीत जमा केला जाणार आहे. नागरिकांनी यात आपापल्या परीने मदत करण्याचे आवाहन महापौर सुजाता पाटील यांनी केले आहे. १ ते ४ नोव्हेंबर यादरम्यान चालणाऱ्या या महोत्सवात दीप संध्या, मंगळागौर, स्थानिक महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि बहुप्रतीक्षित खेळ पैठणीचा-होम मिनिस्टर अशा विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी लाभणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.