

ज्येष्ठ लेखक वेद राही यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : डोगरी साहित्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देतानाच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या लेखणीचा आणि दिग्दर्शनाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक, पटकथाकार आणि दिग्दर्शक वेद राही (वय ९३) यांचे रविवारी (ता. १) सकाळी ठाण्यातील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनाने डोगरी साहित्यविश्वासह भारतीय साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांच्या पार्थिवावर कोपरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत.
वेद राही यांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी लेखनाला सुरुवात केली. डोगरी, हिंदी आणि उर्दू या भाषांमध्ये त्यांनी विपुल साहित्यनिर्मिती केली. डोगरी भाषेतील ‘आले’ या कथासंग्रहासाठी त्यांना १९८३ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. डोगरी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी दिलेल्या प्रदीर्घ योगदानाची दखल घेत साहित्य अकादमीने २०२४ मध्ये त्यांना सर्वोच्च सन्मानाच्या ‘साहित्य अकादमी फेलोशिप’ने सन्मानित केले.
साहित्यलेखनाबरोबरच वेद राही यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘पवित्र पापी’, ‘बेईमान’, ‘संन्यासी’ आणि ‘चरस’ यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा आणि संवादलेखन केले. ‘प्रेम पर्वत’, ‘दरार’ आणि ‘आंधी सुरंग’ या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. अभिनेत्री रेखा आणि शशी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘काली घटा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती त्यांनी केली होती. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वीर सावरकर’ या चरित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यांच्या नावावर आहे.
दूरचित्रवाणीच्या क्षेत्रातही त्यांनी आपली सर्जनशील छाप उमटवली. काश्मिरी कुटुंबाच्या जीवनावर आधारित ‘गुल गुलशन गुलफाम’ या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. डोगरीसारख्या प्रादेशिक भाषेतील साहित्यापासून हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीपर्यंत विविध माध्यमांतून त्यांनी आपल्या प्रतिभेचा आविष्कार घडवला. साहित्य आणि मनोरंजनविश्व यांच्यात सांस्कृतिक दुवा निर्माण करणाऱ्या वेद राही यांच्या निधनाने भारतीय कला-साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
---------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.