

चारोटी-डहाणू मार्ग खड्डेमय
वाहनचालकांची कसरत; तातडीच्या दुरुस्तीची मागणी
कासा, ता. २ (बातमीदार) : दिवाळीच्या सणासाठी बाजारपेठेत खरेदीला जाणाऱ्या नागरिकांना चारोटी-डहाणू राज्य मार्गावरील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांची कसरत होत असून, अपघातांचा धोका वाढला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. चार दिवसांपूर्वी गंजाड परिसरात खड्ड्यांमुळे दोन दुचाकींची धडक होऊन दोघे जखमी झाले. त्यामुळे रस्त्याचे कायमस्वरूपी काम पूर्ण होईपर्यंत किमान तात्पुरती दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
डहाणू-चारोटी राज्य मार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मार्गावर अनेक ठिकाणी मोऱ्या आणि पुलांची कामे सुरू असून, गंजाड ते डहाणूदरम्यानही काँक्रीटीकरण केले जात आहे. या कामासाठी काही ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. दुसरीकडे, गंजाड ते चारोटी दरम्यानच्या काही भागांत अद्याप दुरुस्तीची कामे सुरू झालेली नाहीत. या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढते. दिवाळीनिमित्त डहाणू बाजारपेठेत खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ वाढली आहे. अशा परिस्थितीत रस्त्याची दुरवस्था प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करत आहे. काँक्रीटीकरण पूर्ण होण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याने संबंधित बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवून वाहतुकीसाठी रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी होत आहे.
चौकट
तात्पुरती दुरुस्ती आवश्यक
‘‘दिवाळीच्या सणानिमित्त खरेदीसाठी अनेक नागरिकांना डहाणूला जावे लागते, असे उपसरपंच प्रसाद पाटील म्हणाले, मात्र रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. कायमस्वरूपी काम पूर्ण होईपर्यंत तरी खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
खड्डे बुजविण्याच्या सूचना
‘‘डहाणू-चारोटी राज्य मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे, अशी माहिती डहाणू बांधकाम विभागाचे शाखा अभियंता मनीष चकदरे यांनी दिली. तसेच चारोटीच्या दिशेने काही भागांत अद्याप काम सुरू झालेले नाही. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.