

जिल्ह्यात खासदार क्रीडासंग्रामाची पर्वणी
खेळाडूंच्या कौशल्याला हक्काचे व्यासपीठ
कल्याण, ता. २ (वार्ताहर) : क्रीडांगण कोणतेही असो, जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर आपली छाप पाडण्याची संधी आता ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना मिळणार आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने २० ते २९ नोव्हेंबरदरम्यान ‘खासदार क्रीडासंग्राम सीझन २’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा स्पर्धेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, कल्याणसह ठाणे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील खेळाडूंनाही सहभागाची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील १५ हून अधिक ठिकाणी २७ क्रीडा प्रकारांमध्ये हा क्रीडा महोत्सव रंगणार आहे.
क्रिकेटपासून कबड्डीपर्यंत, कुस्तीपासून जलतरणापर्यंत आणि मैदानी खेळांपासून आधुनिक क्रीडा प्रकारांपर्यंत विविध खेळांचा समावेश करण्यात आला आहे. ॲथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, जलतरण, मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स, तिरंदाजी, बॉक्सिंग, रायफल शूटिंग, बुद्धिबळ, बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस, तायक्वांदो, रोलर स्केटिंग, रग्बी यांसह २७ खेळांत खेळाडूंना कौशल्य दाखवता येणार आहे. त्यामुळे वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारांतील खेळाडूंना स्पर्धेचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
गेल्या वर्षी आयोजित पहिल्या क्रीडासंग्रामाला हजारो खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. या प्रतिसादामुळे यंदा स्पर्धेचा विस्तार संपूर्ण ठाणे जिल्ह्यात करण्यात आला आहे. अनेक तरुणांमध्ये क्रीडा गुणवत्ता असूनही योग्य संधी आणि व्यासपीठाअभावी त्यांना पुढे जाता येत नाही. अशा नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील गुणवत्ता हेरणे आणि क्रीडा क्षेत्राकडे तरुणांचा ओढा वाढविणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने यापूर्वी टेनिस क्रिकेटमधील खेळाडूंसाठी ‘प्रेसिडेंट कप इंडिया २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. आता खासदार क्रीडासंग्रामाच्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमाला खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे, कल्याण, ठाणे आणि भिवंडी मतदारसंघांतील आमदार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रकाश पाटील तसेच जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभत आहे.
अशी करा ऑनलाइन नोंदणी
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पोस्टरवरील क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या ओटीपीद्वारे लॉगिन केल्यानंतर आवडीचा खेळ निवडून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यानंतर खेळाडूंना ‘खासदार संग्राम पास’ मिळणार आहे. स्पर्धेचे वेळापत्रक आणि पुढील माहिती अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर उपलब्ध होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.