गाईच्या वासरावर बिबट्याचा हल्ला

गाईच्या वासरावर बिबट्याचा हल्ला
Published on: 

बोर्डी, ता. २ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील चंडीगाव येथील महिलेवर बिबट्याचा जीवघेणा हल्ल्याची घटना ताजी असतानाच तलासरीतील झाई-बोरी गव ग्रुप ग्रामपंचायत क्षेत्रातील दर्जीपाडा येथील बागायतदार महेश राऊत यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला केला आहे. ही घटना आज (ता. २) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात गाईचे वासरू दगावले आहे.

मागील वर्षी या परिसरात सातत्याने बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले होते. किंबहुना कुंपणाच्या तारेमध्ये एक बिबट्या अडकून पडला होता. यंदा पावसाळ्यात तीन महिने वगळता बिबट्याने पुन्हा एकदा आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दर्जीपाडा येथील हल्ल्याचा बोर्डी वन क्षेत्रपाल कार्यालयातील वन अधिकारी नवीन माच्छी यांनी आढावा घेतला. सूर्याहास चौधरी, वन सुरक्षा अधिकारी प्रशांत भोसले यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक नागरिकांना बिबट्यापासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन केले.

बिबट्याचा उपद्रव टाळण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजकुमार सावे आणि जगदीश राऊत यांनी केली आहे.
----
शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीती
कासा (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिनाभरात बिबट्यांच्या हल्ल्यांत दोन महिलांचा मृत्यू झाल्याचा दावा करत, नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी नरभक्षक बिबट्यांना ठार करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मिलिंद पाटील यांनी राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

डहाणू तालुक्यातील चंडीगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात काम करण्यासाठी जाणेही धोकादायक वाटू लागल्याने शेतीच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी वन विभाग आणि पोलिसांना आवश्यक ती तातडीची पावले उचलण्याचे निर्देश द्यावेत. वन विभागाकडून बिबट्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.