

माणगावातील अन्नत्याग आंदोलन स्थगित
सर्व तालुक्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन
माणगाव, ता. २ (वार्ताहर) : संपूर्ण रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी माणगाव तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. पालकमंत्री भरत गोगावले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश असलेला दुष्काळग्रस्त क्षेत्राचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलकांनी लिंबूपाणी प्राशन करून आंदोलनाची सांगता केली.
यंदा रायगड जिल्ह्यात भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी आर्थिक मदत द्यावी, शेतमजुरांना दिलासा मिळावा आणि प्रलंबित पीक पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या होत्या.
पालकमंत्री गोगावले यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका मांडली. सर्व तालुक्यांचा समावेश असलेला दुष्काळग्रस्त क्षेत्राचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी त्यांनी शेताच्या बांधावर जाऊन भातशेतीच्या नुकसानीची पाहणी केली होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागांचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते.
पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. या वेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष
आंदोलनाची सांगता झाली असली, तरी दुष्काळग्रस्त क्षेत्राचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर होऊन प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.