

प्राणी-पक्ष्यांची काळजी घ्या
फटाक्यांच्या आवाजाने मुक्या जीवांची घालमेल; प्राणीमित्र संघटनांचे आवाहन
बेलापूर, ता. २ (बातमीदार) : दिवाळीचा आनंद साजरा करताना फटाक्यांच्या आवाजाचा आणि धुराचा त्रास केवळ माणसांनाच नव्हे, तर प्राणी आणि पक्ष्यांनाही सहन करावा लागतो. कर्णकर्कश आवाजामुळे कुत्रे, मांजरे यांसारखे प्राणी भेदरून सैरावैरा पळतात, तर पक्षी घरटी सोडून दूर जातात. या काळात अनेक प्राणी-पक्षी जखमी होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे दिवाळी साजरी करताना मुक्या जीवांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन प्राणीमित्र संघटनांकडून करण्यात येत आहे.
फटाक्यांच्या आवाजामुळे प्राण्यांमध्ये भीती, चिडचिड, अस्वस्थता आणि खाणे-पिणे सोडण्यासारखे बदल दिसून येतात. घाबरलेले प्राणी रस्त्यावर धावू लागतात. त्यामुळे वाहनाखाली येणे, खड्ड्यात पडणे किंवा भिंतींना धडकणे असे अपघात होऊ शकतात. काही वेळा यात त्यांचा जीवही जातो. फटाक्यांच्या धुरामुळे प्राणी आणि पक्ष्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो.
मुक्या जीवांसाठी घ्यावी काळजी
दिवाळीत पाळीव प्राण्यांना शक्यतो घरात सुरक्षित ठिकाणी ठेवावे. दारे-खिडक्या बंद करून बाहेरील आवाज कमी करावा. त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी घरात मंद आवाजात गाणी किंवा दूरचित्रवाणी लावावी. घाबरलेल्या प्राण्यांना एकटे सोडू नये. त्यांना पुरेसे पाणी द्यावे. फटाके उडवताना मोकळ्या जागेची निवड करावी, जेणेकरून प्राणी-पक्ष्यांना इजा होणार नाही.
फटाक्यांच्या धुरामुळे प्राणी-पक्ष्यांना त्वचेचे त्रास होऊ शकतात. मोठ्या आवाजामुळे ते घाबरतात, काही वेळा त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. पाळीव तसेच भटक्या प्राण्यांना अधिक पाणी द्यावे. फटाके उडवताना प्राणी-पक्ष्यांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुवैद्य डॉ. शिवाजी तळेकर यांनी केले.
आनंदासोबत संवेदनशीलताही हवी
दिवाळीचा उत्सव साजरा करताना परिसरातील भटके प्राणी आणि पक्ष्यांच्या सुरक्षिततेची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. आवाज आणि धूर कमी ठेवून सणाचा आनंद घेतल्यास मुक्या जीवांनाही दिलासा मिळू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.