

आठविंद्यांपासून विक्रमगडमध्ये दिवाळीचा उत्सव
धान्यसमृद्धीच्या पारंपरिक प्रथेचे आजही जतन
विक्रमगड (बातमीदार) : बदलत्या काळानुसार सण-उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीत मोठे बदल झाले असले, तरी विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण भागात पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचे जतन आजही श्रद्धेने केले जात आहे. याच परंपरेचा प्रत्यय दिवाळीच्या निमित्ताने येत असून, शहरांमध्ये लक्ष्मीपूजनापासून मुख्य दिवाळीला सुरुवात होत असताना विक्रमगड परिसरातील गाव-पाड्यांमध्ये मात्र आठवडाभर आधीच दीपोत्सवाची चाहूल लागते. ‘आठविंदे’ या पारंपरिक प्रथेपासून येथील दिवाळीला सुरुवात होते.
आठविंद्यांच्या दिवशी सायंकाळी घरातील महिला अंगण स्वच्छ करून शेणाने सारवतात. त्यानंतर लाकूड जाळून तयार झालेल्या राखेच्या सहाय्याने घराच्या प्रवेशद्वारासमोर आठविंदे रेखाटले जातात. धान्य साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कणग्यांच्या तसेच मानवी आकृत्यांच्या स्वरूपातील ही रेखाटने असतात. त्यांची विधिवत पूजा करून समृद्धीची प्रार्थना केली जाते.
घरातील धान्याच्या कणग्या वर्षभर भरलेल्या राहाव्यात, कुटुंबाला अन्नधान्याची कमतरता भासू नये आणि घरात सुख-समृद्धी नांदावी, अशी श्रद्धा या प्रथेमागे आहे. त्यामुळे ग्रामीण कुटुंबांमध्ये आठविंदे पूजनाला विशेष महत्त्व आहे. या वेळी दुधाचा नैवेद्य दाखवण्याबरोबरच ‘काकडी-पोळी’ हा पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केला जातो. गव्हाचे पीठ, किसलेली काकडी, गूळ आणि तूप यांचे मिश्रण करून तयार केलेल्या पोळ्या तुपात भाजल्या जातात. त्यांचा नैवेद्य देवाला अर्पण केला जातो.
आठविंद्यांपासूनच घराघरांत दिवाळीच्या तयारीला वेग येतो. वर्षभर जपून ठेवलेल्या मातीच्या पणत्या बाहेर काढून स्वच्छ केल्या जातात. घरासमोर, अंगणात आणि देवघरात पणत्या प्रज्वलित केल्या जातात. त्यामुळे मुख्य दिवाळीच्या आधीच गाव-पाड्यांमध्ये दीपोत्सवाचे प्रसन्न वातावरण निर्माण होते.
विशेष म्हणजे, ही परंपरा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित नसून, त्यातून अन्नधान्याचे महत्त्व, निसर्गाशी असलेले नाते आणि पूर्वजांची जीवनपद्धती नव्या पिढीपर्यंत पोहोचवली जात आहे. आधुनिकतेच्या प्रवाहातही विक्रमगड परिसरातील ग्रामीण भागाने जपलेली ही दिवाळी स्थानिक लोकसंस्कृतीचे वेगळेपण अधोरेखित करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.