

अग्निशमन दलाला फायर बाइक
अरुंद रस्त्यांतील आगीवर तातडीने नियंत्रण; महापालिकेच्या ताफ्यात दोन दुचाकी दाखल
पनवेल, ता. २ (बातमीदार) : शहरातील अरुंद गल्ल्या, दाट लोकवस्ती आणि गर्दीच्या बाजारपेठांमध्ये आग लागल्यास मोठ्या अग्निशमन वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यात अनेक अडचणी येतात. अशा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविण्यासाठी पनवेल महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दोन ‘फायर बाइक’ दाखल झाल्या आहेत. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या दुचाकींमुळे आग नियंत्रणाच्या कामाला अधिक वेग मिळणार आहे.
पनवेल शहरासह नवीन पनवेल, कळंबोली आणि इतर नागरी भागांमध्ये वाढती लोकसंख्या व वाहनांची वर्दळ लक्षात घेता अग्निशमन यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे. विशेषतः अरुंद गल्ल्या, बाजारपेठा आणि उंचसखल भागांत मोठ्या वाहनांना पोहोचणे कठीण होते. अशा ठिकाणी फायर बाइक वेगाने पोहोचून प्राथमिक स्तरावर आग आटोक्यात आणण्यास मदत करतील.
रॉयल एनफिल्ड बुलेटवर आधारित या दुचाकींना सुमारे २४ लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि उच्च दाबाचा पंप जोडण्यात आला आहे. तसेच अग्निशमन यंत्र, सायरन, लुकलुकणारे दिवे आणि बिनतारी संदेशवहनाची सुविधाही उपलब्ध आहे. छोट्या आगीवर तातडीने नियंत्रण मिळविणे, आगीचा फैलाव रोखणे आणि मुख्य अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचेपर्यंत प्राथमिक मदत करणे, अशी महत्त्वाची भूमिका या दुचाकी बजावतील.
वेगवान प्रतिसादाला मदत
गर्दीच्या ठिकाणी कमी वेळेत पोहोचून प्राथमिक उपाययोजना करण्यासाठी या दुचाकी उपयुक्त ठरणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी या वाहनांचा उपयोग होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.