फटाक्यांचा धूर ठरू शकतो घातक

फटाक्यांचा धूर ठरू शकतो घातक
Published on: 

फटाक्यांचा धूर ठरू शकतो घातक
सूक्ष्म प्रदूषक कणांमुळे दमा, सीओपीडीचा त्रास वाढण्याची भीती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : दिवाळीत फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे निर्माण होणारा धूर आणि वायुप्रदूषण श्वसन तसेच हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी त्रासदायक ठरू शकते. विशेषतः दमा, सीओपीडी, सायनस आणि फुप्फुसांचे विकार असलेल्या व्यक्तींना खोकला, घशात खवखव, धाप लागणे, श्वास घेताना घरघर आणि छातीत जडपणा जाणवण्याचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे फटाक्यांच्या धुरापासून दूर राहून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
फटाके जळताना सूक्ष्म प्रदूषक कण आणि विविध घातक वायू हवेत मिसळतात. यामुळे श्वसनमार्गाला सूज येऊन ते अधिक संवेदनशील होतात. आधीपासून दमा किंवा फुप्फुसांचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये त्याचा परिणाम अधिक तीव्र होऊ शकतो. खोकला, धाप वाढणे, छातीत जडपणा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

हृदयविकाराच्या रुग्णांना अधिक धोका
वायुप्रदूषणाचा परिणाम फुप्फुसांबरोबरच हृदयावरही होतो. प्रदूषित हवेमुळे शरीरातील दाह वाढून रक्तवाहिन्यांवर ताण येऊ शकतो. त्यामुळे हृदयविकार असलेल्या रुग्णांच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असते. अशा रुग्णांनी धुराचा थेट संपर्क टाळावा, डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमित घ्यावीत आणि शक्यतो प्रदूषण कमी असलेल्या वातावरणात राहावे.

गर्भवती महिला, मुलांनीही दक्षता घ्यावी
लहान मुलांची श्वसनसंस्था विकसित होत असल्याने त्यांच्यावर प्रदूषणाचा परिणाम अधिक होऊ शकतो. गर्भवती महिलांनीही फटाक्यांच्या धुराच्या थेट संपर्कात अधिक वेळ राहणे टाळावे. विशेषतः श्वसनविकार असलेल्या मुलांनी आणि गर्भवती महिलांनी प्रदूषित वातावरणापासून शक्य तितके दूर राहावे.

कोणत्या तक्रारी वाढू शकतात?
श्वसनविकार, खोकला आणि घशात खवखव, धाप लागणे, श्वास घेताना घरघर, दमा आणि सीओपीडीचा त्रास वाढणे, श्वसनमार्गाचे संसर्ग, फुप्फुसांच्या आजारांच्या तक्रारी वाढणे

प्रदूषणापासून बचावासाठी काय कराल?
फटाके जाळण्याच्या ठिकाणी उभे राहणे आणि धुराचा थेट संपर्क टाळा, डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घ्या, प्रदूषणाची पातळी जास्त असल्यास अनावश्यक शारीरिक श्रम टाळावेत, धाप वाढणे, छातीत दुखणे किंवा ऑक्सिजनची पातळी कमी होणे, अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, हृदयविकार आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी धुरापासून दूर राहावे.

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत असताना खोकला, घशात खवखव, धाप लागणे, श्वास घेताना घरघर आणि छातीत जडपणा, अशा तक्रारींच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. विशेषतः दमा आणि सीओपीडी असलेल्या रुग्णांवर वायुप्रदूषणाचा अधिक परिणाम होतो. दम्याचे झटके, सीओपीडीचा त्रास आणि श्वसनसंसर्गाचा धोका वाढू शकतो.
- डॉ. स्वप्नील मेहता, सल्लागार फुप्फुसरोगतज्ज्ञ, डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.