

सायन रुग्णालयात लिंगबदल शस्त्रक्रियांचा उच्चांक
तीन वर्षांत ३५ शस्त्रक्रिया; जे. जे., नायरमध्ये प्रत्येकी एक, केईएममध्ये शून्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबईतील सरकारी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये लिंगबदल शस्त्रक्रियांच्या उपलब्धतेचे आणि प्रत्यक्ष उपचारांचे चित्र वेगवेगळे असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. सायन रुग्णालयात गेल्या तीन वर्षांत ३५ ‘टॉप’ आणि ‘बॉटम’ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्याच्या तुलनेत जे. जे. रुग्णालयात केवळ एक, नायर रुग्णालयात एक, तर केईएम रुग्णालयात एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मागवलेल्या माहितीतून ही बाब स्पष्ट झाली.
सायन रुग्णालयाच्या प्लॅस्टिक शस्त्रक्रिया विभागाने गेल्या तीन वर्षांत ३५ शस्त्रक्रिया झाल्याची माहिती दिली आहे. तर सर्वसाधारण शस्त्रक्रिया विभागाने मार्च २०२३ पासून १४ शस्त्रक्रिया केल्याचे स्वतंत्रपणे नमूद केले आहे. या रुग्णांचा पुढील उपचार आणि पाठपुरावा प्लॅस्टिक शस्त्रक्रिया विभागाकडून केला जातो. शस्त्रक्रियेचे यश किंवा अपयश मोजण्यासाठी निश्चित निकष नसल्याचेही रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.
जे. जे. रुग्णालयात २०२३-२४ या आर्थिक वर्षात एक शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतरच्या दोन आर्थिक वर्षांत एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. नायर रुग्णालयातही आतापर्यंत एका शस्त्रक्रियेची नोंद आहे. केईएम रुग्णालयात मात्र अशा प्रकारची एकही शस्त्रक्रिया झालेली नाही.
सायनमध्ये रुग्णसंख्या अधिक का?
सायन रुग्णालयात या शस्त्रक्रियांची संख्या तुलनेने अधिक असण्यामागे रुग्णांमधील परस्पर अनुभवांची देवाणघेवाण हे एक कारण असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. उपचाराचा अनुभव चांगला असल्यास हे रुग्ण इतरांना या रुग्णालयाची माहिती देतात. या शस्त्रक्रियांसाठी विविध विभागांमध्ये समन्वय आवश्यक असून, प्लॅस्टिक शस्त्रक्रिया विभागाने उपचाराची पद्धत विकसित केली आहे.
मानसिक आरोग्यतज्ज्ञांचे प्रमाणपत्र अनिवार्य
सायन रुग्णालयात लिंगबदल शस्त्रक्रियेपूर्वी दोन पात्र मानसिक आरोग्यतज्ज्ञांकडून रुग्णाची तपासणी, समुपदेशन आणि मूल्यांकन केले जाते. दोन्ही तज्ज्ञांचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच शस्त्रक्रियेची प्रक्रिया पुढे नेली जाते. सायन आणि नायर रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी पाच हजार रुपये शुल्क आकारले जाते. वैद्यकीय साहित्य आणि इतर उपकरणांचा खर्च स्वतंत्र असतो. दरम्यान, नायर रुग्णालयात दरवर्षी साधारण आठ ते नऊ आंतरलिंगी रुग्णांची नोंद होत असल्याचे आरटीआयमधून समोर आले आहे. मात्र, सायन रुग्णालयात अशा रुग्णांवर उपचार झाल्याची नोंद नाही. जे. जे. रुग्णालयातही गेल्या तीन वर्षांत आंतरलिंगी रुग्णांच्या प्रकरणांची नोंद नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.