चिमुकल्याची ठसक्यातून सुटका

चिमुकल्याची ठसक्यातून सुटका
Published on: 

चिमुकल्याची ठसक्यातून सुटका
वारंवार न्यूमोनियाचे कारण ठरलेली जन्मजात फट डॉक्टरांनी केली बंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : दूध पिताना वारंवार ठसका लागणे, खोकला येणे आणि त्यानंतर वारंवार न्यूमोनिया होणाऱ्या सहा महिन्यांच्या बाळावर बाई जेरबाई वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी दुर्मिळ जन्मजात दोषावर यशस्वी उपचार केले. तपासणीत अन्ननलिका आणि स्वरयंत्र यांच्यामध्ये गंभीर फट असल्याचे आढळले. तोंडावाटे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून ही फट बंद करण्यात आली. त्यामुळे मानेवर मोठी चिरफाड करण्याची तसेच श्वास घेण्यासाठी श्वासनलिकेला छिद्र करून ट्रॅकिओस्टॉमी करण्याची गरज भासली नाही.
कल्याण येथील सोनकली आणि अंजनी तिवारी यांच्या सहा महिन्यांच्या बाळाला ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तीव्र न्यूमोनिया झाला होता. त्याचा आवाजही घोगरा झाला होता. त्यामुळे त्याला वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालरोग फुप्फुसविकार तज्ज्ञांच्या पथकाने ब्रॉन्कोस्कोपी केली. त्यातून हा जन्मजात दोष निदर्शनास आला.
या दोषामुळे दूध किंवा द्रवपदार्थ अन्ननलिकेत जाण्याऐवजी श्वसनमार्गात जाण्याचा धोका असतो. परिणामी वारंवार छातीचे संसर्ग, न्यूमोनिया आणि फुप्फुसांना दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. शस्त्रक्रियेपूर्वी बाळाला नाकातून पोटात जाणाऱ्या नळीने दूध देण्यात आले. त्यामुळे अन्न श्वसनमार्गात जाण्याचा धोका कमी करून बाळाचे वजन वाढवणे शक्य झाले.
शस्त्रक्रियेनंतर बाळाला एक दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सामान्य कक्षात हलविल्यानंतर त्याने पुन्हा तोंडावाटे दूध घेण्यास सुरुवात केली. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आठवडाभरात त्याला घरी सोडण्यात आले.
रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले की, अशा दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या आजारांमध्ये विविध वैद्यकीय विभागांचा समन्वय महत्त्वाचा ठरतो.

भूल देण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची
कान-नाक-घसा सर्जन डॉ. बालगोपाल कुरुप यांच्या नेतृत्वाखाली, बालरोग फुप्फुसविकार तज्ज्ञ डॉ. पार्थ चंदने, भूलतज्ज्ञ डॉ. मुक्ता शिखरे आणि त्यांच्या पथकाने नुकतीच ही शस्त्रक्रिया केली. कॅमेरा व विशेष उपकरणांच्या मदतीने तोंडातूनच फट बंद करण्यात आली. बाळाचे वय कमी आणि फट स्वरयंत्राच्या खोल भागात असल्याने शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. शस्त्रक्रियेदरम्यान बाळाला स्वतःहून श्वास घेता येणे आवश्यक असल्याने भूल देण्याची प्रक्रियाही गुंतागुंतीची होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.