सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर;

सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर;
Published on: 

सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न
विमा संरक्षणाची मागणी

कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसरात्र राबणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न कल्याण-डोंबिवली महापालिकेतील एका घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. कामावर असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या सफाई कर्मचाऱ्याच्या उपचारांसाठी अखेर त्याच्या सहकाऱ्यांनाच आर्थिक मदतीसाठी पुढाकार घ्यावा लागला. महापालिकेकडून वैद्यकीय विम्याचे संरक्षण उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

सोमवारी सकाळी कामावर हजर असताना आनंद साबळे या सफाई कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी रक्त पातळ करण्यासाठी ४५ हजार रुपये किमतीचे इंजेक्शन देण्यास सांगितले. मात्र, वैद्यकीय विमा नसल्याने उपचारांचा खर्च कसा उभा करायचा असा पेच निर्माण झाला. अखेर सहकारी सफाई कर्मचाऱ्यांनी आपापसात पैसे जमा करून इंजेक्शनसाठी आवश्यक रक्कम उभी केली. उपचारानंतर संबंधित कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर सफाई कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय विमा सुविधा लागू करण्याची मागणी पुढे आली आहे. मनसेचे जिल्हाप्रमुख तथा महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष उल्हास भोईर, नगरसेवक गणेश लांडगे आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने वैद्यकीय विमा संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी महापालिका प्रशासन आता काय निर्णय घेते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.