

जेल तलावाच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
सोलस इंडियाकडून स्वच्छतेवर भर
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : आधारवाडी कारागृहाजवळील जेल तलावाच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तलावात मिसळणारे सांडपाणी आणि नागरिकांकडून टाकला जाणारा कचरा यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावत असल्याची बाब सोलस इंडियाच्या १०१ व्या स्वच्छता अभियानादरम्यान समोर आली. या मोहिमेत दाऊदी बोहरा समाजाने सक्रिय सहभाग घेत स्वच्छता आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला.
सोलस इंडियाच्या राष्ट्रीय संयोजक डॉ. रुपिंदर कौर यांनी तलावाच्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. कारागृहातून बाहेर पडणारे सांडपाणी तलावात मिसळत असल्याने पाणी दूषित होत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय नागरिकांकडून प्लॅस्टिक, जुने कपडे, चपला-बूट आणि निर्माल्य तलावात टाकले जात असल्याने प्रदूषणात भर पडत आहे. दरवर्षी गणेश विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या या तलावाची विसर्जनानंतर योग्य स्वच्छता आणि देखभाल होत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
तलावात मिसळणाऱ्या सांडपाण्याचा स्रोत शोधून तो बंद करणे, पाण्याची गुणवत्ता तपासणे आणि कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली. तसेच तलावाची मालकी कोणाकडे आहे आणि त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी केडीएमसीची नेमकी किती, याबाबत स्पष्टता आणण्याची गरज व्यक्त केली. सार्वजनिक निधीतून खासगी मालमत्तेची स्वच्छता करण्यासाठी निविदा काढण्याच्या प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
या अभियानात रत्नेश महाडिक, स्वप्नील म्हात्रे, देवेंटरी शर्मा यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी संयुक्तपणे जबाबदारी घेण्याची गरज या वेळी अधोरेखित करण्यात आली. स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता सातत्याने राबवली जाणारी सामूहिक जबाबदारी असावी, असे डॉ. कौर यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.