

मुलांच्या विकासासाठी संवाद महत्त्वाचा
डॉ. नंदकुमार मुलमुले यांचे पालकांना मार्गदर्शन
ठाणे, ता. ३ (बातमीदार) : मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये स्क्रीनच्या व्यसनाचे प्रमाण वाढत असून, त्याचा परिणाम त्यांच्या एकाग्रतेवर, सर्जनशीलतेवर आणि भावनिक विकासावर होत आहे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी केवळ निर्बंध घालून उपयोग नाही, तर त्यांच्याशी संवाद साधणे, खेळण्यासाठी वेळ देणे आणि पालकांनी स्वतःच्या मोबाईल वापरावर मर्यादा आणणे आवश्यक आहे, असे मत मनोविकारतज्ज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी नुकतेच व्यक्त केले.
वेध अॅक्टिंग अकॅडमी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहयोग मंदिर येथे ‘रोटरी वेध-भेट’ कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारती सहस्रबुद्धे यांनी डॉ. मुलमुले यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाची सुरुवात बालनाट्य, एकपात्री प्रयोग आणि गीतांच्या सादरीकरणाने झाली. रोटरी क्लबच्या अध्यक्ष अश्विनी वाडिया, सचिव केदार पटवर्धन आणि वेध अकॅडमीच्या अदिती ओक उपस्थित होत्या.
मोबाईलच्या अतिवापराबाबत बोलताना डॉ. मुलमुले यांनी तीन वर्षांपर्यंतच्या मुलांना स्क्रीन दाखवू नये, असे स्पष्ट केले. मुलांच्या आयुष्यात खेळाला पहिले प्राधान्य असले पाहिजे, मात्र बागा आणि मैदाने कमी होत असल्याने मुलांचा मोबाईलकडे कल वाढत आहे. मुलांना काही वेळ कंटाळा येऊ देणेही गरजेचे आहे. कारण त्यातूनच त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशील विचारांना चालना मिळते. जेवताना, कुटुंबासोबत वेळ घालवताना आणि झोपण्यापूर्वी पालकांनीही मोबाईल वापरणे टाळावे. पालकांच्या वर्तनाचेच अनुकरण मुले करतात, असे त्यांनी सांगितले.
रील्स आणि सतत बदलणाऱ्या डिजिटल आशयामुळे मुलांची एकाग्रता कमी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे मुलांना नाट्यकला, संगीत आणि खेळ अशा उपक्रमांकडे वळवण्याचे आवाहन त्यांनी केले. पालकत्वासाठी ‘कनेक्शन, डायरेक्शन आणि करेक्शन’ हे तीन टप्पे महत्त्वाचे असल्याचे सांगताना मुलांशी विश्वासाचे नाते निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. मुलांना प्रत्येक अडचणीपासून वाचवण्याऐवजी परिस्थितीचा सामना करण्यास शिकवावे. इतर मुलांशी तुलना करण्यापेक्षा त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करावे. केवळ गुणांपेक्षा विषयांची आवड आणि शिकण्याचा आनंद महत्त्वाचा आहे. मुलांशी संवाद साधताना सकारात्मक विधानांना प्राधान्य देऊन सौम्य भाषेत समजावून सांगावे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.