

खरेदीच्या गर्दीत पाकीटमारांपासून सावध
जव्हार पोलिसांचा सतर्कतेचा इशारा
जव्हार, ता. ३ (बातमीदार) : दिवाळी सणानिमित्त जव्हार शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. कपडे, किराणा, सराफा बाजारासह विविध दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी वर्दळ असल्याने चोरट्यांकडून या गर्दीचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारपेठेत खरेदी करताना तसेच घर बंद ठेवून बाहेर जाताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जव्हार पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण पवार यांनी केले आहे.
दिवाळीच्या काळात अनेक कुटुंबे खरेदीसाठी घराबाहेर पडतात. याच संधीचा गैरफायदा घेत बंद घरांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे घरातून बाहेर पडण्यापूर्वी दागिने, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. घराला कुलूप लावून जाताना शेजारी किंवा विश्वासू व्यक्तींना त्याची कल्पना द्यावी. घरात सीसीटीव्ही यंत्रणा असल्यास ती सुरू असल्याची खात्री करावी. घर बंद असल्याची माहिती अनोळखी व्यक्तींना किंवा समाजमाध्यमांवर शेअर करणे टाळावे, असे पोलिसांनी सूचित केले आहे.
बाजारपेठेतील गर्दीत महिलांनी दागिन्यांची विशेष काळजी घ्यावी. पर्स, मोबाइल आणि पैशांचे पाकीट सुरक्षित ठेवावे. खरेदी करताना अनोळखी व्यक्तींकडून मदतीच्या बहाण्याने होणाऱ्या फसवणुकीपासूनही सावध राहावे. गर्दीत धक्काबुक्की किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे.
दरम्यान, सणाच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जव्हार पोलिसांकडून आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन निरीक्षक किरण पवार यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.