पुनर्विकासाच्या नावाखाली बोगस करपावत्यांचे रॅकेट

पुनर्विकासाच्या नावाखाली बोगस करपावत्यांचे रॅकेट
Published on: 

पुनर्विकासासाठी बोगस करपावत्यांचे रॅकेट?

कर आकारणीचे ऑडिट करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ३ : ठाणे शहरात क्लस्टर, झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) आणि पुनर्विकास योजनांना वेग आला असताना, या योजनांमधील पात्रता सिद्ध करण्यासाठी मालमत्ता कराच्या बनावट पावत्या तयार करणारे रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. पाचपाखाडी येथील एका पुनर्विकास प्रकल्पात अशा प्रकारचा गैरव्यवहार उघडकीस आला असून, याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने गेल्या पाच वर्षांतील मालमत्ता कर आकारणीचे विशेष ऑडिट करावे, अशी मागणी केळकर यांनी केली आहे.

खोपट येथील भाजप कार्यालयात आयोजित १४१व्या ‘जनसेवकाचा जनसंवाद’ कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. क्लस्टर, एसआरए आणि पुनर्विकास योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित मालमत्तेची पात्रता सिद्ध करावी लागते. त्यासाठी मालमत्ता कराच्या पावत्यांना महत्त्व असते. याच प्रक्रियेचा गैरफायदा घेत बोगस कागदपत्रांच्या आधारे करपावत्या तयार केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या माध्यमातून लाखो रुपयांचे व्यवहार होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पाचपाखाडीतील प्रकरण हे अशा गैरव्यवहाराचे उदाहरण असून, शहरातील इतर भागांतही अशा प्रकारांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केवळ एका प्रकरणापुरती चौकशी मर्यादित न ठेवता, गेल्या पाच वर्षांतील कर आकारणीची तपासणी करणे आवश्यक आहे. विशेष ऑडिटमुळे बनावट पावत्या तयार करण्याचे प्रकार उघडकीस येतील आणि अशा गैरप्रकारांना आळा बसेल, असे केळकर यांनी सांगितले.

जंजिरा किल्ल्यावर ‘मिशन भगवा’
जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने ‘मिशन भगवा’ मोहीम सुरू केली आहे. या मागणीसाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाला सह्यांची निवेदने देण्यात आली आहेत. तसेच राज्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची पत्रेही सादर करण्यात आली आहेत. नुकतेच प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली किल्ल्यावर आंदोलन करण्यात आले. ही मोहीम पुढेही सुरू ठेवणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.