रोह्यात शेतकरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार

रोह्यात शेतकरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार
Published on: 

रोह्यात शेतकरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार
दुष्काळी यादीत समावेशासह हमीभावासाठी २६ नोव्हेंबरला आंदोलन
रोहा, ता. ३ (बातमीदार) : भातपिकांचे अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, भाताला प्रतिक्विंटल साडेतीन ते चार हजार रुपये हमीभाव द्यावा, तसेच केवायसी यंत्रणेतील त्रुटी दूर कराव्यात, या मागण्यांसाठी २६ नोव्हेंबर या संविधान दिनी रोहा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी (ता. २) शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
रोहा शेतकरी प्रतिष्ठान, बळीराजा सामाजिक शेतकरी संघटना रायगड आणि बळीराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. लहरी हवामानामुळे पाऊस गायब झाल्याने भातपिके करपली, तर उरलेल्या पिकाचे सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने नुकसान केले. या नैसर्गिक आपत्तीनंतरही तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश झालेला नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळत नसल्याबाबत बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

विविध संघटनांची एकजूट
या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील करणार आहेत. बैठकीला शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत, हेमंत ठाकूर, विनायक धामणे, राजेंद्र जाधव, विठ्ठल मोरे, अनंत मगर, दगडू बामुगडे, श्याम लोखंडे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने आंदोलन करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.

फोटो कॅप्शन : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित बैठकीला उपस्थित विनायक धामणे, राजेंद्र जाधव, विठ्ठल मोरे, हेमंत ठाकूर आदी मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.