

मुरूड तालुक्यात भातकापणी सुरू
अनियमित पावसामुळे उत्पादनात घट; मजुरीचे दरही वाढले
मुरूड, ता. ३ (बातमीदार) : खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या भाताची मुरूड तालुक्यात सुमारे ३,२०० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. सध्या शेतकऱ्यांनी भातकापणीला सुरुवात केली असून, शेतशिवारात कापणीची लगबग सुरू झाली आहे.
यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने ओढ दिल्याने धूळपेरणी वाया गेली. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना राहू पद्धतीने भातलागवड करावी लागली. अतिवृष्टी आणि त्यानंतर पावसाचा पडलेला खंड याचा भातपिकाला मोठा फटका बसला. २४ सप्टेंबरला तालुक्यात शेवटचा ९ मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम झाला. तालुक्यात एकूण २३८० मि.मी. पावसाची नोंद झाली असली, तरी अनियमित पावसामुळे काही भागांतील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः उखारू जमिनीतील भाताचे दाणे न पोसल्याने शेतकऱ्यांच्या हाती केवळ पेंढा आला आहे.
अपेक्षित उत्पादन मिळण्याची आशा धूसर झाल्याने शेतकरी उरलेले पीक सुरक्षितपणे घरात आणण्यासाठी धडपडत आहेत. अनेक ठिकाणी भातकापणीची कामे वेगाने सुरू आहेत. दरम्यान, मजुरांची टंचाई जाणवत असून महिला मजुरांना ३५० रुपये, तर पुरुष मजुरांना ५५० ते ६०० रुपये मजुरी द्यावी लागत आहे.
मुरूड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होऊन शासनाकडून पंचनामे करण्यात यावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अंशतः मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे शासनाच्या निर्णयाकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.