नवी मुंबईत फेरीवाल्यांचे अतिक्रमण

नवी मुंबईत फेरीवाल्यांचे अतिक्रमण
Published on: 

नवी मुंबईत फेरीवाल्यांचे अतिक्रमण
कारवाईतील दुजाभावावर लोकप्रतिनिधींचा आक्षेप
वाशी, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबईतील दिघा, ऐरोलीसह विविध विभागांत फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, वाहतुकीचे प्रश्नही गंभीर बनले आहेत. या समस्येकडे लक्ष वेधत नगरसेविका अपर्णा गवते आणि नगरसेवक मनोज हळदणकर यांनी महापालिकेच्या सभागृहात प्रशासनाला धारेवर धरले. तसेच अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप करीत कठोर उपाययोजनांची मागणी केली.
शहरातील रस्ते, पदपथ आणि रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने पादचाऱ्यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरसेविका अपर्णा गवते यांनी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत महापालिकेकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला. तर नगरसेवक मनोज हळदणकर यांनी ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेरील बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासनाच्या गाड्यांवर लोगो लावून काही विक्रेते व्यवसाय करीत असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
यावर अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त सुखदेव येडवे यांनी महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले. मात्र, विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने कारवाई करताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः रात्रीच्या वेळी फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

कारवाईसमोरील अडथळे
अतिक्रमण नियंत्रण विभागातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे कारवाई प्रभावीपणे राबविण्यात अडचणी येत असल्याचे प्रशासनाने मान्य केले. या पार्श्वभूमीवर महापौर सुजाता पाटील यांनी अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. संबंधित विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांऐवजी अन्य विभाग कार्यालयातील अतिक्रमण नियंत्रण पथक पाठवून कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यामुळे दिघा आणि ऐरोली परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रत्यक्षात कोणती पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.