शिष्यवृत्ती अर्जातील ''घरपट्टी-पाणीपट्टी''ची अट रद्द!

शिष्यवृत्ती अर्जातील ''घरपट्टी-पाणीपट्टी''ची अट रद्द!
Published on: 

शिष्यवृत्ती अर्जातील घरपट्टी, पाणीपट्टीची अट रद्द!
सभागृहात ठराव मंजूर; ४० ते ४५ हजार विद्यार्थ्यांना दिलासा
वाशी, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरल्याची पावती जोडण्याची अट अखेर रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरातील हजारो विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. भाजपचे सदस्य गिरीश म्हात्रे यांनी याबाबत सर्वसाधारण सभेत ठरावाची सूचना मांडल्यानंतर सभागृहाने हा प्रस्ताव मंजूर केला.
नवी मुंबई महापालिकेमार्फत पहिलीपासून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेसाठी दरवर्षी सुमारे ४० ते ४५ हजार विद्यार्थी अर्ज करतात. मात्र, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अर्जासोबत पालकांनी महापालिकेचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरल्याची पावती जोडणे बंधनकारक करण्यात आले होते. याशिवाय नगरसेवकाचे शिफारसपत्र जोडण्याची अटही घालण्यात आली होती.
शहरातील गावठाणे, विस्तारित गावठाणे आणि झोपडपट्टी परिसरांत मोठ्या संख्येने भाडेकरू व सर्वसामान्य कुटुंबे राहतात. अनेक इमारतींचा कर भरलेला नसणे किंवा तांत्रिक अडचणी यामुळे पालकांना आवश्यक पावत्या मिळविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे केवळ कागदपत्रांच्या अभावामुळे पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.

ठरावाला सभागृहाची मंजुरी
या अटींवर भाजपचे सदस्य गिरीश म्हात्रे यांनी आक्षेप घेत सर्वसाधारण सभेत ठरावाची सूचना मांडली. विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक ठरणारी ही अट तातडीने रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर सभागृहात सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या पावत्या जोडण्याची अट रद्द करण्याचा प्रस्ताव एकमताने आणि बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे आता या कागदपत्रांच्या अटीशिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.