शिष्यवृत्तीसाठी मतदार यादीतील नावाची अट अनिवार्य

शिष्यवृत्तीसाठी मतदार यादीतील नावाची अट अनिवार्य
Published on: 

शिष्यवृत्तीसाठी मतदार यादीतील नावाची अट अनिवार्य
किशोर पाटकरांकडून निर्णयाला विरोध
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ : नवी मुंबई महापालिकेच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे नाव महापालिका क्षेत्रातील मतदार यादीत असणे अनिवार्य करण्यात आले आहे. महासभेत मंजूर झालेल्या या नव्या नियमामुळे शहरातील अनेक गरजू विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता नगरसेवक किशोर पाटकर यांनी व्यक्त केली. या अटीला त्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
नव्या नियमावलीनुसार, शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांचे नाव नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे. तसेच पालकांनी महापालिकेचा मालमत्ता कर पूर्ण भरलेला असावा, अशी अटही नमूद करण्यात आली आहे. यापूर्वी अर्जासोबत आवश्यक असलेले संबंधित स्थानिक नगरसेवकाचे शिफारसपत्र आता अनिवार्य न ठेवता ऐच्छिक करण्यात आले आहे.
या निर्णयावर आक्षेप घेताना किशोर पाटकर यांनी शिष्यवृत्तीचा उद्देश गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे हा आहे, असे सांगितले. मात्र मतदार यादीतील नावाची अट लागू केल्यास भाड्याने राहणारे, कामानिमित्त स्थलांतरित झालेले तसेच मतदार यादीत नोंद नसलेल्या पालकांची मुले लाभापासून दूर राहू शकतात. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणात राजकीय निकष आणू नयेत. शिष्यवृत्ती देताना विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती यांचाच विचार व्हावा, अशी भूमिका पाटकर यांनी मांडली. महासभेतही त्यांनी या नियमाला विरोध केला. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून मतदार यादीतील नावाची अट रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.