शहापूर बाजार समितीत सत्तांतराचे वारे

शहापूर बाजार समितीत सत्तांतराचे वारे
Published on: 

भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. ३ : शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्तासंघर्ष उफाळून आला असून, सभापती नंदलाल डोहळे आणि उपसभापती शरद वेखंडे यांच्याविरोधात १८ पैकी १२ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. कामकाज करताना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करीत या संचालकांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी १२ नोव्हेंबरला अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी विशेष सभा घेण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे शहापूर तालुक्यातील सहकार क्षेत्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपचे नंदलाल डोहळे सभापती, तर शिवसेना शिंदे गटाचे शरद वेखंडे उपसभापती आहेत. १८ संचालकांपैकी १० संचालक भाजप-शिवसेना युतीचे असून, तीन वर्षांपासून समितीवर युतीचे वर्चस्व आहे. मात्र, सभापती आणि उपसभापती यांनी संचालकांना विश्वासात न घेता कारभार सुरू ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, मंजूर ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याने बाजार समिती तोट्यात गेल्याचा दावा संचालकांनी केला आहे.
सरकारकडून बाजार समितीच्या विकासासाठी कोणताही नवीन प्रकल्प आणण्यात आला नसल्याचा आक्षेपही अविश्वास ठरावात नोंदविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय १२ संचालकांनी एकत्र येत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला.

१२ नोव्हेंबरला विशेष सभा
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम २३ (३) मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सभेची नोटीस निर्गमित केली आहे. त्यानुसार १२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या सभागृहात अविश्वास ठरावावर चर्चा व मतदान होणार आहे. या विशेष सभेत अविश्वास ठराव मंजूर होणार की सभापती नंदलाल डोहळे आणि उपसभापती शरद वेखंडे आपली पदे कायम राखणार, याकडे शहापूर तालुक्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.