

स्वच्छतेसाठी नगरसेवकांनी काय केले?
कांजूर कचराभूमीप्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : आपापल्या प्रभांगांची स्वच्छता किंवा कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी नगरसेवकांनी कोणती पावले उचलली, जनजागृती केली का, अशी विचारणा मंगळवारी (ता. ३) उच्च न्यायालयाने केली. तसेच कांजूरमार्ग कचराभूमीतून येणारी दुर्गंधी आणि प्रदूषण आटोक्यात न आल्यास ठोस कारवाईचे आदेश देण्यात येतील, असा इशाराही न्यायालयाने दिला.
निवडून आलेले पालिकेचे प्रतिनिधी केवळ महापालिका प्रशासनावर टीका करण्यापलीकडे फारसे काही करत नसल्याचे निरीक्षण न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने आज नोंदवले. तसेच हे नगरसेवक ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात, तेथील नागरिकांप्रति त्यांचीही जबाबदारी असल्याची आठवणही न्यायालयाने करून दिली. आम्हाला एक नगरसेवक दाखवा जो झोपडपट्टीमध्ये जाऊन कचऱ्यांसंबंधी जनजागृती करतो, कन्नमवारनगर येथील नगरसेवकाने या कचऱ्यांच्या समस्येवर काय पावले उचलली ते सांगा, त्यांना फक्त मत हवी असतात, अशा शब्दांत न्यायालयाने नगरसेवकांची कानउघाडणी केली. कचराभूमीची दुर्गंधी रोखण्याबाबत उचललेल्या पावलांबाबत न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. एक दिवस दुर्गंधी कमी झाली म्हणजे परिस्थिती सुधारली असे नाही, आतापर्यंत स्थिती नियंत्रणात असायला हवी होती, असे खंडपीठाने नमूद केले. मुळात, स्प्रिंकलर बसवणे किंवा तत्सम उपाययोजना करणे, हे वरवरचे उपाय आहेत; यामुळे मूळ समस्या सुटणार नाही. त्यांनी कचरा व्यवस्थापनासाठी एक वेगळा दृष्टिकोन स्वीकारण्याचे न्यायालयाने नमूद केले.
तक्रारी सुरूच!
पालिका, कंत्राटदारांकडून वारंवार उपाययोजना करूनही रहिवासी अजूनही दुर्गंधीबाबत तक्रारी करत आहेत. त्यामुळे आता काहीतरी वेगळे करणे गरजेचे आहे. कचऱ्याच्या स्रोताच्या ठिकाणी वर्गीकरण करण्याच्या पद्धतीत बदल आवश्यक असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.
न्यायालयीन नियुक्त समिती करते काय?
न्यायालयाने नियुक्त केलेली समिती काय करते, अशी विचारणा न्यायालयाने केली. समितीकडून वेळोवेळी बैठका घेतल्या जातात का?, त्याच्याकडून उपाययोजना सुचवले जातात का?, अहवालात कुठेही ठोस उपाय सुचवला नसल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.
त्रिसदस्यीय अमायकसची नियुक्ती
न्यायालयाला सहकार्य करण्यासाठी तीन वकिलांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती केली. तसेच, महापालिका आयुक्तांना कचरा वर्गीकरणाचे विकेंद्रीकरण करणे शक्य आहे का, हे तपासण्यास आणि प्रत्येक प्रभागातील कचऱ्याच्या परिस्थितीचे स्वतंत्र ऑडिट करण्यास सांगितले.
वॉर्ड अधिकाऱ्यांवर कारवाई करा!
कन्नमवारनगर येथील प्रियदर्शनी या पालिकेच्या उद्यानाबाहेर कचरा टाकण्यात येत असल्याचे फोटो न्यायालयात दाखवण्यात आले. त्यावर, न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या प्रभागातील सहाय्यक आयुक्त काय करतात, अशी विचारणाही न्यायालयाने केली. ज्या प्रभागांमधील रस्त्यांवर कचरा साचून राहतो, त्या भागातील जबाबदार वॉर्ड अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांना दिले आणि यासंदर्भात केलेल्या कारवाईचा तपशील सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.