ठाणे जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करा

ठाणे जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करा
Published on: 

ठाणे दुष्काळाच्या छायेत
बळीराजा सेवा फाउंडेशनचे मंत्रालयात मदतीसाठी साकडे

मुरबाड, ता. ४ (वार्ताहर) : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करताना ठाणे जिल्ह्याला वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मुरबाड, शहापूरसह संपूर्ण जिल्ह्यात खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले असून, ठाणे जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी बळीराजा सेवा फाउंडेशनने केली आहे. यासंदर्भात संस्थेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालय, महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष यांना निवेदन सादर केले.

फाउंडेशनचे अध्यक्ष कृष्णकांत मधुकर मलिक यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवेदनाची दखल घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

कोकण आणि ठाणे जिल्ह्यात सरासरी पाऊस अधिक असल्याच्या सांख्यिकी गृहीतकावर जिल्ह्याला दुष्काळी यादीतून वगळल्याचा आरोप फाउंडेशनने केला आहे. मुरबाड आणि शहापूर परिसर डोंगराळ असून, जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता कमी आहे. पावसातील दीर्घ खंडामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला. ऐन पीकवाढीच्या काळात पाणी न मिळाल्याने भात, नाचणी, वरई आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विहिरींची पाणीपातळीही खालावत असल्याने आगामी काळात पाणी आणि चाराटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कर्जमाफीची मागणी
जिल्ह्यातील शेतजमिनींचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करून संपूर्ण ठाणे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, बाधित शेतकऱ्यांना विशेष पॅकेजद्वारे हेक्टरी मदत द्यावी, चालू वर्षाचे पीक कर्ज माफ करून वसुलीला स्थगिती द्यावी आणि वीजबिल माफ करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच दुर्गम पाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा, रोजगार हमीची कामे सुरू करणे आणि शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणीही निवेदनात केली आहे.

आंदोलनाचा इशारा
शासनाने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कृष्णकांत मलिक यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.