उरण तालुक्यात भातपिकाच्या कापणी-मळणीला जोरदार सुरुवात;

उरण तालुक्यात भातपिकाच्या कापणी-मळणीला जोरदार सुरुवात;
Published on: 

उरणमध्ये कापणी-मळणीला वेग
दाणे भरण्याआधीच पावसाची दडी मारल्यामुळे उत्पादन घटण्याची भीती

उरण, ता. ४ (बातमीदार) : उरण तालुक्यात भातपिकाच्या कापणी-मळणीच्या हंगामाला वेग आला असून, शेतकरी शेतात व्यस्त आहेत, मात्र यंदा भाताचे दाणे भरण्याच्या निर्णायक टप्प्यावरच पावसाने पाठ फिरवल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये भाताच्या लोंब्यांमध्ये दाणे भरण्याऐवजी पळींज तयार झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

यंदा उरण तालुक्यात शेतकऱ्यांनी वेळेत भातलावणी पूर्ण केली होती. सुरुवातीला पावसाने चांगली साथ दिल्याने पीकही जोमात आले होते. त्यामुळे चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती, मात्र पीक तयार होण्याच्या आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पावसाचा खंड पडल्याने भातपिकाची वाढ आणि दाणे भरण्याची प्रक्रिया प्रभावित झाली. परिणामी, अनेक ठिकाणी लोंब्यांमध्ये दाण्यांऐवजी पळींज दिसत असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे खते, बियाणे, मजुरी आणि शेतीच्या मशागतीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढला आहे. उत्पादन घटल्यास वाढता खर्च भरून काढणेही कठीण होणार आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेतीला फटका बसत असतानाही उरणमधील शेतकरी पारंपरिक भातशेती टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, यंदाच्या हंगामातील नुकसानीमुळे कापणी-मळणीच्या काळातही शेतकऱ्यांना आनंदाऐवजी चिंतेने ग्रासले आहे.

आर्थिक नुकसानाची शक्यता
भातपिकाला दाणे भरण्याच्या निर्णायक टप्प्यावर पावसाची गरज असते, मात्र यंदा याच काळात पावसाने दडी मारल्याने अनेक शेतांतील लोंब्यांमध्ये दाणे तयार झाले नाहीत. परिणामी, भाताचे अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.