डोंबिवलीच्या नाट्यवैभवाला नवी झळाळी!

डोंबिवलीच्या नाट्यवैभवाला नवी झळाळी!
Published on: 

कल्याण, ता. ५ (बातमीदार) : डोंबिवलीच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नाट्यगृहाच्या उर्वरित कामांसाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे.

या प्रकल्पासाठी यापूर्वी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. आता अतिरिक्त ३० कोटींची मंजुरी मिळाल्याने पुनर्विकासासाठी एकूण ४५ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नगरविकास विभागाने यासंदर्भातील सरकार निर्णय जारी केला आहे. महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेअंतर्गत हा संपूर्ण निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे.

नाट्यगृहाची इमारत जीर्ण झाल्यामुळे ते बंद ठेवण्यात आले होते. परिणामी, डोंबिवलीतील स्थानिक कलाकार, नाट्यसंस्था आणि रसिकांची मोठी गैरसोय होत होती. आता उर्वरित कामांसाठी निधी उपलब्ध झाल्याने पुनर्विकासाला गती मिळणार आहे. डोंबिवलीच्या सांस्कृतिक परंपरेला साजेसे आणि आधुनिक सुविधांनी युक्त नाट्यगृह लवकरच कलारसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

नाट्यगृहात असणार आधुनिक सुविधा
पुनर्विकसित नाट्यगृहात भव्य रंगमंच, आरामदायी आसनव्यवस्था, आधुनिक प्रकाशयोजना आणि आकर्षक अंतर्गत सजावट असेल. छोट्या नाट्यप्रयोगांसाठी स्वतंत्र रंगमंच, कलाकारांच्या तालमीसाठी सराव कक्ष आणि कलाप्रदर्शनांसाठी स्वतंत्र कलादालन उभारण्यात येणार आहे. याशिवाय नाट्यगृहाच्या बाह्य परिसराचेही सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.