२०२९ मध्येही मोदींचाच झेंडा - रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास

२०२९ मध्येही मोदींचाच झेंडा - रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास
Published on: 

२०२९ मध्येही मोदींचाच झेंडा
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा विश्वास
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : देशातील राजकीय समीकरणे बदलण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विरोधकांना २०२९ मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाला सामोरे जावे लागेल. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी मोदी हेच एनडीएचे प्रमुख चेहरा असतील, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहण्याआधी आणखी प्रतीक्षा करावी, असा टोला लगावला.
ठाण्यातील विश्रामगृहात आठवले यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधकांच्या आंदोलनांवर त्यांनी जोरदार टीका केली. देशात कोणालाही आंदोलन करण्याचा आणि सरकारविरोधात आवाज उठविण्याचा अधिकार आहे, मात्र आंदोलन करून सरकार बदलता येत नाही. भारत म्हणजे बांगलादेश किंवा नेपाळ नाही, असा इशारा देत त्यांनी विरोधकांच्या आंदोलनात्मक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नामांतराच्या आंदोलनात आम्हीही रस्त्यावर उतरलो होतो; मात्र प्रत्येक सरकारला अशा आंदोलनांना सामोरे जावे लागते, असेही ते म्हणाले. मतचोरी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आठवले यांनी काँग्रेसला धारेवर धरले. निवडणूक आयोगाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून, ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी एवढे मोठे आंदोलन उभारण्याची गरज नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करून पराभवाचे खापर यंत्रणेवर फोडणे योग्य नाही. ईव्हीएम मोदींनी आणलेली नाहीत. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या की नाही, याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा. आमची बॅलेट पेपरवर निवडणूक लढविण्याचीही तयारी आहे, असे आव्हान त्यांनी दिले. राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारीने वागावे. सरकारविरोधातील आक्षेप आणि प्रश्न संसदेत मांडावेत. काँग्रेसकडून मुस्लिम आणि दलित समाजाला संविधानाच्या मुद्द्यावरून भडकविण्याचे काम केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

...तर सुप्रिया सुळेंना कॅबिनेट मंत्रिपद!
शरद पवार यांच्या प्रकृतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून विचारपूस केल्याच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी जुन्या राजकीय घडामोडींनाही उजाळा दिला. २०१९ मध्ये शरद पवार भाजपसोबत आले असते, तर २०२२ मध्ये ते राष्ट्रपती झाले असते. आता पवार भाजपसोबत येण्याची शक्यता कमी वाटत असली, तरी विकासाच्या मुद्द्यावर मतभेद बाजूला ठेवून एकत्र येता येऊ शकते, असे ते म्हणाले. पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत युती केल्यास सुप्रिया सुळे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकते, असे सूचक विधान करून त्यांनी नव्या राजकीय चर्चेला तोंड फोडले. पवार यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोणालाही पाठीशी घालू नका
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर बोलताना आठवले यांनी पोलिसांच्या तपासावर निष्पक्षतेचा आग्रह धरला. या प्रकरणाची कोणत्याही दबावाशिवाय चौकशी झाली पाहिजे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही; मात्र तपासाच्या नावाखाली विनाकारण कोणावरही अन्याय होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.