

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण :
एसआटीच्या तपासावर कुटुंबीय असमाधानी
अन्य तपास यंत्रणेकडे तपास वर्ग करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : ठाणे येथील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (बाळू पूर्णेकर) हत्ये प्रकरणी पूर्णेकर कुटुबीयांनी उच्च न्यायालयात बुधवारी (ता. ४) धाव घेतली आहे. प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कार्यपद्धतीवर याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, तपास अन्य तपास यंत्रणेकडे वर्ग करण्याची प्रमुख मागणी पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर बुधवारी न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठासमोर प्रकरण सुनावणीसाठी आले असता न्यायालयाने त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला, मात्र याचिकाकर्त्यांना सुट्टीकालीन न्यायालयात दाद मागण्याची मुभाही दिली.
याचिकेत मागणी काय?
विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू असलेल्या तपासावर कुटुंबीयांनी असमाधान व्यक्त केले आहे. या प्रकरणातील साक्षीदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवावी, अन्यथा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी मागणीही याचिकाकर्ते मंदार घोडके यांनी ॲड. मयूरी हटले यांच्यामार्फत केलेल्या याचिकेतून केली आहे. आतापर्यंत अनेक पुरावे आणि सीसीटीव्हीच्या चित्रफिती तपास यंत्रणेला देण्यात आले आहे, मात्र त्याकडे एसआयटीने दुर्लक्ष केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश एसटीएफने अटक केलेल्या संतोष कनोजियाने (टल्ली) प्रयागराज न्यायालयात ब्लॉकप्रमुख आणि नगरसेवक यांच्यातील वादातून ही हत्या झाल्याचा दावा केला आहे. संबंधित कागदपत्रेही सादर केली आहेत, मात्र स्थानिक एसआयटीने या माहितीचा तपास अहवालात किंवा आरोपीच्या कोठडीच्या मागणीच्या अहवालात उल्लेख केलेला नसल्याचेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तपास अन्य यंत्रणेकडे सोपविण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रकरण काय?
२९ सप्टेंबरला ठाण्यातील मानपाडा येथील प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आतापर्यंत ५ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये सुभाष उर्फ पप्या शिंदे, निखिल यादव, नितेश पवार, मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि त्याचा साथीदार अमित सिंग उर्फ पल्लू यांचा समावेश आहे.