

बेशिस्तपणा खपवून घेणार नाही!
लेटलतीफ पदाधिकाऱ्यांना काँग्रेस प्रभारी प्रसाद यांचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दादरच्या टिळक भवन येथे कोकण विभागातील लोकसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी, विधानसभा प्रभारी आणि जिल्हाध्यक्ष यांची संयुक्त बैठक बुधवारी (ता. ४) पार पडली. या बैठकीला उशीर झाल्याने डॉ. प्रसाद यांनी संताप व्यक्त करून लेटलतीफ पदाधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच असा बेशिस्तपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी पदाधिकाऱ्यांना दिला.
तेलंगणातील काँग्रेस नेते डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची अलीकडेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली. संघटनात्मक कौशल्यासाठी ओळखले जाणारे प्रसाद यांनी प्रभारी म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी राज्यापासून ते जिल्हा स्तरापर्यंत बैठकांचा सपाटा लावला आहे. यादरम्यान बुधवारी त्यांनी कोकण विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र सकाळी ११.३० वाजता होणाऱ्या बैठकीला काही जिल्हाध्यक्ष आणि प्रभारी पोहोचले नाहीत, तर काही जण उशिराने पोहोचले. त्यामुळे ही बैठक १२.३० वाजता सुरू झाली. या लेटलतीफांमुळे प्रसाद यांनी संताप व्यक्त केला आणि बैठकीला अनुपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. तसेच अशी बेशिस्त यापुढे खपवून घेतली जाणार नाही. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचे प्रभारी जे बैठकीला आले नाहीत, त्यांच्या कामाचा आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या धोरणामुळे काँग्रेसमध्ये अर्धवेळ आणि मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वचक बसेल का, असा प्रश्नही विचारला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.