फटाके वाजविण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंतच मुदत

फटाके वाजविण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंतच मुदत
Published on: 

फटाके वाजविण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंतच मुदत
ध्वनी व वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज
वाशी, ता. ५ (बातमीदार) ः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ध्वनी आणि वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिकेने कडक पावले उचलली आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांना सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेतच फटाके वाजवण्याची परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून, तक्रारींसाठी पालिकेने प्रभागनिहाय हेल्पलाईन क्रमांक आणि ई-मेल आयडी जाहीर केले आहेत.
दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे हवेतील प्रदूषणात मोठी वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सामान्य दिवसांत सरासरी ९१ असणारा हवा गुणवत्ता निर्देशांक दिवाळीदरम्यान वाढून सरासरी २१२ पर्यंत पोहोचत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. यामुळे नागरिकांना श्वसनविकारांसह विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करावी, तर पोलिस प्रशासन आणि महापालिकेच्या विभागीय सहाय्यक आयुक्तांनी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दक्षता घ्यावी, असेही निर्देश आहेत. बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा या आठ विभागांसाठी स्वतंत्र भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडी जाहीर करण्यात आले आहेत.

घातक व १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी
अधिसूचनेनुसार १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर पूर्ण बंदी आहे. बेरियम सॉल्ट, लिथियम, अर्सेनिक, शिसे आणि पारा यांसारखी घातक रसायने असलेल्या फटाक्यांवर कठोर बंदी घालण्यात आली आहे. फटाकेविक्रेत्यांनी महापालिकेने निश्चित केलेल्या अधिकृत ठिकाणीच सर्व परवानग्या घेऊन विक्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फटाके वाजविण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.