झाडांवरील रोषणाई भोवणार

झाडांवरील रोषणाई भोवणार
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : दिवाळीच्या निमित्ताने शहरातील झाडांवर विद्युत माळा लावून रोषणाई करण्याचा प्रकार आता संबंधितांना भोवण्याची शक्यता आहे. झाडांच्या खोडांना खिळे ठोकून त्यावर विद्युत तारा आणि केबल्स गुंडाळण्याच्या प्रकाराची ठाणे महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. शहरातील झाडांवरील अनधिकृत रोषणाई हटवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असून, कारवाईला सुरुवातही झाली आहे. या मोहिमेत पहिला दणका हिरानंदानी इस्टेट आणि हिरानंदानी मेडोजला बसला आहे. येथील झाडांवरील विद्युत माळा हटवण्यात आल्या असून, हिरानंदानी इस्टेटमधील रोमा बिल्डर्स यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महापालिकेने पोलिसांकडे केली आहे.

दिवाळीच्या काळात शहरातील रस्ते, दुभाजक आणि हरित पट्ट्यांमधील झाडांवर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. रंगीबेरंगी दिव्यांनी शहर उजळून निघत असले, तरी या सजावटीसाठी झाडांच्या खोडांमध्ये खिळे ठोकणे, विद्युत माळा आणि केबल्स गुंडाळणे असे प्रकार घडतात. यामुळे झाडांचे नुकसान होत असून, प्रखर एलईडी दिव्यांमुळे पक्ष्यांच्या अधिवासालाही धोका निर्माण होतो. या प्रकाराविरोधात पर्यावरणप्रेमींकडून गेल्या अनेक वर्षांपासून आवाज उठवला जात आहे, मात्र आता त्याची दखल घेत महापालिकेने थेट कारवाईचा पवित्रा घेतला आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकाकर्ते आणि पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी बुधवारी (ता. ४) महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. हिरानंदानी इस्टेट आणि हिरानंदानी मेडोज परिसरातील शेकडो झाडांवर विद्युत रोषणाई केल्याचे जिओ-टॅग छायाचित्रांसह पुरावे त्यांनी आयुक्तांना सादर केले. झाडांच्या खोडांमध्ये खिळे ठोकून विद्युत माळा लावल्याचेही निदर्शनास आणून दिले. या तक्रारीची गंभीर दखल घेत आयुक्तांनी शहरातील झाडांवरील विद्युत माळा, केबल्स आणि खिळे तातडीने हटवण्याचे आदेश दिले. तसेच झाडांचे नुकसान करणाऱ्यांविरोधात वृक्ष संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने हिरानंदानी इस्टेट आणि मेडोज परिसरात प्रत्यक्ष कारवाई करून झाडांवरील रोषणाई हटवली. याप्रकरणी उद्यान निरीक्षकांनी बुधवारीच कासारवडवली पोलिसांना अधिकृत पत्र पाठवले आहे.

माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत हिरानंदानी इस्टेट येथील रस्तादुभाजक आणि हरित पट्ट्यातील झाडांवर बेकायदा विद्युत रोषणाई केल्याप्रकरणी रोमा बिल्डर्स यांची चौकशी करून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. हिरानंदानी परिसरातील कारवाईनंतर आता महापालिका शहरातील अन्य भागांतील झाडांवरील रोषणाईही हटवणार का, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्य सोसायट्या, व्यापारी संकुले आणि आस्थापनांवरही गुन्हे दाखल होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

मोठ्या लढ्याला यश
झाडांच्या खोडांमध्ये खिळे ठोकल्याने त्यांना जखमा होत असून, झाडांवर आश्रय घेणाऱ्या पक्ष्यांच्या अधिवासावरही परिणाम होतो. विद्युत तारांमध्ये बिघाड झाल्यास शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याचा धोका आहे. त्यामुळे केवळ सौंदर्यीकरणाच्या नावाखाली झाडांचे नुकसान करणे थांबवण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत होती. या लढ्याला आता मोठे यश आल्याची भावना पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी व्यक्त केली आहे.

दुष्काळात विजेचा अपव्यय नको!
सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांना पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असताना झाडांवरील अनावश्यक रोषणाईसाठी विजेचा वापर करणेही अयोग्य असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकरी संकटाचा सामना करत असताना शहरांमध्ये अशा प्रकारे विजेचा अपव्यय टाळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.