

ठाणे, ता. ५ : विमा पॉलिसीधारकांच्या संमतीशिवाय बनावट सह्या आणि खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून विम्याची रक्कम स्वतःच्या भावाच्या बँक खात्यात वर्ग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंडसइंड निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या ठाण्यातील शाखेतील वरिष्ठ व्यवस्थापक लक्ष्मण शिर्के याने भावाच्या मदतीने पाच विमाधारकांची २७ लाख २४ हजार ५२२ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार श्रीनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
कंपनीच्या फ्रॉड कंट्रोल युनिटमध्ये उपव्यवस्थापक वासुदेव टिकम यांच्या तक्रारीत, शिर्के याने पाच विमाधारकांच्या पॉलिसीची मिळणारी रक्कम त्यांच्या परवानगीशिवाय बनावट सह्या करून आणि नामनिर्देशित व्यक्तींची खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करून मिळवली. एकूण १९ लाख आठ हजार ५२२ रुपये त्याने भावाच्या आयडीएफसी फर्स्ट बँकेतील खात्यात वर्ग केले.
याशिवाय, एका विमाधारकाला पेन्शन पॉलिसी काढून देण्याचे प्रलोभन दाखवून बनावट ई-मेल आयडीच्या माध्यमातून आठ लाख १६ हजार रुपये घेतल्याचाही आरोप आहे. हा प्रकार १९ डिसेंबर २०२५ ते ६ जून २०२६ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. लक्ष्मण शिर्के आणि त्याचा भाऊ रामचंद्र शिर्के यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून कंपनी आणि ग्राहकांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.