काँग्रेस कार्यालयाचे परस्पर नामांतर

काँग्रेस कार्यालयाचे परस्पर नामांतर
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : महापालिकेच्या मालमत्ता नोंदीतून युवक काँग्रेस कार्यालयाचे नामांतर करून ते शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय केल्याचा कथित प्रकार ठाण्यात समोर आला आहे. बनावट संमतीपत्र आणि खोट्या स्वाक्षरीच्या आधारे हा बदल करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. मात्र, नोंद बदलण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन आणि मूळ नोंद पूर्ववत करण्याच्या मागणीवर काँग्रेस ठाम आहे.

वागळे इस्टेटमधील किसन नगर क्रमांक ४, रोड क्रमांक २८ येथे युवक काँग्रेस कार्यालयाच्या नावाने महापालिकेच्या दप्तरी नोंदवलेली आहे. या मालमत्तेचा नियमित मालमत्ता करही काँग्रेसकडून भरला जातो. मात्र, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या नावाने कथित बनावट संमतीपत्र तयार करून त्यांच्या खोट्या स्वाक्षरीचा वापर करण्यात आला. त्याआधारे कार्यालयाची नोंद ‘सुरेश रमेश राम, शिवसेना जनसंपर्क कार्यालय, शांतिनगर’ अशी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकाराबाबत काँग्रेसने १० सप्टेंबरला पुराव्यांसह महापालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, ५० दिवसांहून अधिक काळ उलटूनही कारवाई न झाल्याने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल कारभारी पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. या वेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांचे अधिकृत मूळ पत्रही आयुक्तांकडे सादर करण्यात आले. त्यानंतर आयुक्तांनी संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

सात दिवसांची मुदत
मालमत्तेची नोंद बदलताना कागदपत्रांची पडताळणी कोणी केली आणि या प्रक्रियेला मंजुरी कोणी दिली, याची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे. तसेच युवक काँग्रेस कार्यालयाची मूळ नोंद पूर्ववत करावी. प्रशासनाने सात दिवसांत योग्य कारवाई न केल्यास आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन करण्यासह उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा राहुल पिंगळे यांनी दिला आहे.