ठाण्यात सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

ठाण्यात सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : दिवाळीचा आनंद साजरा करताना फटाक्यांच्या धुरातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्याची वेळ आली आहे. वातावरणातील बदलामुळे ठाणे शहरात आधीच सर्दी, खोकला, ताप आणि घसादुखीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना दिवाळीतील फटाक्यांची आतषबाजी श्वसनविकारांचा धोका अधिक वाढवू शकते. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दम्याचे रुग्ण आणि श्वसनाचे विकार असलेल्यांना फटाक्यांच्या धुराचा अधिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दिवाळीचा उत्साह साजरा करताना आरोग्याशी तडजोड करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन ठाणे महापालिकेनेही आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील चढ-उतारामुळे शहरात सर्दी-खोकल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांना ताप, घसादुखी आणि श्वसनाचा त्रास जाणवत आहे. विशेष म्हणजे काही रुग्णांमध्ये आठवडाभरापेक्षा अधिक काळ ही लक्षणे कायम राहत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत दिवाळीत फटाक्यांमधून बाहेर पडणारा धूर आणि सूक्ष्म धूलिकण हवेत मिसळल्यास नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. फटाक्यांच्या धुरामुळे डोळ्यांची जळजळ, घशात खवखव, खोकला, दम लागणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. दम्याच्या रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर ठरू शकते. सध्या ठाणे शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीत असला, तरी दिवाळीतील आतषबाजीनंतर प्रदूषणाची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

दरम्यान, संभाव्य रुग्णवाढीचा विचार करून महापालिकेच्या आरोग्य विभागाने औषधोपचारांची तयारी केली आहे. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासह सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधांचा मुबलक साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. विशेषतः दम्याच्या आणि श्वसनविकारांच्या रुग्णांसाठी इनहेलरचा साठाही सज्ज ठेवण्यात आला आहे.

वातावरणातील बदल आणि फटाक्यांच्या धुरामुळे सर्दी, खोकला, घसादुखी, दमा तसेच श्वसन आणि फुफ्फुसांच्या विकारांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे. नागरिकांना श्वसनाचा त्रास, सततचा खोकला किंवा दम लागण्यासारखी लक्षणे जाणवल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
- डॉ. प्रसाद पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी, ठाणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.