

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारले आकर्षक आकाशकंदील
प्रा. डॉ. एन. डी. पाटील प्राथमिक विद्यालयात कार्यशाळा; ९८ विद्यार्थ्यांचा सहभाग
कांदिवली, ता. ५ ः सह्याद्रीनगर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आकाशकंदील बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय शिक्षण मसुदा २०२३ (एससीएफ) राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य तसेच बालभारती, पुणे येथील कार्यशिक्षण समितीचे सदस्य विद्याधर म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारचे, तिसरीच्या विद्यार्थ्यांना फुलपाखराच्या आकाराचे, तर चौथीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या आकाराचे आकर्षक आकाशकंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. म्हात्रे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्यक्ष कृतीतून मार्गदर्शन केले. त्यातून ९८ विद्यार्थ्यांनी सुंदर आणि कल्पक आकाशकंदील तयार केले. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली. मुख्याध्यापक उमाकांत जगताप यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देत त्यांचे स्वागत केले. दीपा उप्पलकर यांनी सूत्रसंचालन केले.
या वेळी विद्यालयातील आदर्श खेळाडू अंश विकास शिंदे (इयत्ता दुसरी) याचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याने भालाफेक, लांब उडी आणि धावणे या क्रीडा प्रकारांत विविध स्पर्धांमध्ये पदके मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. याबद्दल त्याच्यासह त्याच्या पालकांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य मदन चव्हाण, विशाल सह्याद्री सहकारी संस्थेचे सचिव आनंदराव जगताप, कमलाकर जाधव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योती ताईगडे, उपाध्यक्षा शीतल डुबल, सदस्य सिद्धी कावणकर, तेजश्री पवार, नूतन मुसळे यांच्यासह पालक आणि समिती सदस्य उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षिका दीपा उप्पलकर, करुणा मोरे, श्रुतिका पाटील, संपत अनपट आणि मुख्याध्यापक उमाकांत जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा विकास
प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पकता, निरीक्षणशक्ती आणि कार्यानुभव कौशल्यांचा विकास होण्यास मदत होते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.