

डोंगरवाडीकरांचा पाण्यासाठी एल्गार
नळपाणीपुरवठ्यासाठी लाल बावटा आक्रमक
मोखाडा, ता. ५ (बातमीदार) : मोखाडा तालुक्यातील डोंगरवाडीला तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून, विहिरींमध्ये केवळ १० ते १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. जलजीवन मिशनची नळपाणीपुरवठा योजना अद्याप वाडीपर्यंत पोहोचलेली नसल्याने ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी मार्क्सवादी-लेनिनवादी पक्षाच्या (लाल बावटा) नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. आठ दिवसांत नळपाणीपुरवठा सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
डोंगरवाडीत ७२ घरे असून, सुमारे ३५० लोकसंख्या आहे. दरवर्षी येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. हंडाभर पाण्यासाठी महिला वणवण भटकत असताना यंदा पाऊस लवकर परतल्याने विहिरींमधील पाणीसाठाही झपाट्याने कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, डोंगरवाडीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांपर्यंत जलजीवन मिशनची नळयोजना पोहोचली आहे, मात्र डोंगरवाडीला अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नळपाणीपुरवठा योजनेचा विस्तार करून वाडीला नियमित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या वेळी लाल बावटा युवा संघटनेचे भरत तुंबडे, नंदकुमार निखडे, उपसरपंच तुकाराम पवार यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.