वृक्ष लागवडसाठी जागा द्या, नंतरच वृक्षतोडीला परवानगी!

वृक्ष लागवडसाठी जागा द्या, नंतरच वृक्षतोडीला परवानगी!
Published on: 

वृक्षलागवडसाठी जागा द्या, नंतरच वृक्षतोडीला परवानगी!
पनवेल महापालिका ७०१ झाडांच्या संरक्षणासाठी आक्रमक
नवी मुंबई, ता. ५ : तळोजा एमआयडीसीजवळील मौजे चाळ येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या विस्तारासाठी तब्बल ७०१ झाडांचा बळी देण्याच्या प्रस्तावावर पनवेल पालिकेने आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली आहे. आधी वृक्षलागवडीसाठी पर्यायी जागा दाखवा आणि पर्यावरण प्रभाव अहवाल सादर करा, तरच तोडणी किंवा पुनर्रोपणाचा विचार करू, असा थेट इशारा महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने सिडकोला दिला आहे.
गुरुवारी (ता. ५) रोजी पनवेल पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची महत्त्वपूर्ण आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला सदस्य सचिव तथा वृक्ष अधिकारी स्वरूप खारगे, समिती सदस्य परेशा पटेल, प्रदिप भगत, समीर ठाकूर, दशरथ म्हात्रे, प्रियंका कांडपिळे, राम पाटील, मनीषा म्हात्रे, अर्चना भोईर, सुरेश रिसबुड तसेच सहाय्यक आयुक्त बाळाराम रातांबे आणि विभाग प्रमुख विवेक जळे उपस्थित होते. पालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तळोजा एमआयडीसी परिसरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या विस्तारीकरणांतर्गत विविध सुविधा उभारण्यासाठी ७०१ झाडे बाधित होत होती, मात्र केवळ प्रकल्पाच्या नावाखाली सरसकट वृक्षतोड होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत समितीने या प्रस्तावाला ब्रेक लावला असून, तो तूर्तास स्थगित ठेवला आहे.

सिडकोला खडसावले; आधी जागा, मगच निर्णय
झाडे तोडण्यापूर्वी किंवा त्यांचे पुनर्रोपण करण्यापूर्वी पालिकेने सिडको प्रशासनासमोर अटी ठेवल्या आहेत. सिडकोने प्रथम भरपाई वृक्षलागवडीसाठी नेमकी कोणती जागा देणार, याचा सविस्तर तपशील पालिकेकडे सादर करावा लागणार आहे. त्यासोबतच या प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणावरील परिणामांचा अहवाल सादर केल्याशिवाय एकाही झाडाला हात लावू दिला जाणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महापालिका ॲक्शन मोडमध्ये
केवळ ७०१ झाडांचा विस्तार प्रकल्पच नव्हे, तर रस्त्याच्या कामात बाधित होणाऱ्या २२४ वृक्षांच्या प्रस्तावालाही पालिकेने याच कारणास्तव स्थगिती दिली आहे. महापालिकेच्या या भूमिकेमुळे विकासकामांच्या नावाखाली होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीला चाप बसणार असून, झाडांच्या पुनर्लागवडीसाठी ठोस जागा निश्चित झाल्याशिवाय तोडणीला परवानगी न देण्याच्या या निर्णयाचे पनवेलमधील वृक्षप्रेमी आणि नागरिकांकडून जोरदार स्वागत केले जात आहे.

वृक्षछाटणीचे नवे सुधारित दर निश्चित
नागरिकांना वृक्षछाटणी सुलभ, सुसूत्र आणि नियोजनबद्ध रीतीने करता यावी यासाठी शुल्काबाबत स्पष्टता आणण्यात आली आहे. नवीन सुधारित दरानुसार, नागरिकांनी स्वतःच्या स्तरावर वृक्षछाटणी केल्यास प्रति वृक्ष २५० रुपये शुल्क राहील; तर पनवेल पालिकेकडून ही छाटणी करून घ्यायची असल्यास प्रति वृक्ष १,२०० रुपये शुल्क आकारणीस मान्यता देण्यात आली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि शहरातील हिरवळ टिकवून ठेवण्यासाठी पनवेल महापालिकेने उचललेले हे आक्रमक पाऊल वृक्षप्रेमींमधून स्वागतार्ह ठरत आहे.

वृक्षांची हानी केल्यास हजारो रुपयांचा दंड अन् थेट एफआयआर!
झाडांना विद्रूप करणाऱ्या आणि त्यांना इजा पोहोचवणाऱ्या असामाजिक तत्त्वांवर चाप लावण्यासाठी समितीने दंडात्मक कारवाईचे नवे नियम लागू केले आहेत. वृक्षांना खिळे ठोकणे, फलक-जाहिराती टांगणे अथवा विद्युत रोषणाई करून हानी पोहोचवल्यास प्रभागाधिकाऱ्यांमार्फत पहिल्या वेळी प्रति वृक्ष एक हजार रुपये, दुसऱ्या वेळी तीन हजार रुपये आणि तिसऱ्या वेळी पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. तरीही चौथ्या वेळी नियम मोडून उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ च्या कलम २१(१) अन्वये थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.