ठाण्यात नव्या इमारतींचे पाणी तापले!

ठाण्यात नव्या इमारतींचे पाणी तापले!
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : ओसी प्राप्त नव्या इमारतींचा पाणीपुरवठा बंद करण्याच्या घोषणेवरून ठाणे महापालिकेत आज (ता. ५) चांगलेच वातावरण तापले. आयुक्तांची परवानगी न घेता अधिकाऱ्यांनी परस्पर अशी भूमिका जाहीर केल्याने आयुक्त सौरभ राव यांनी पाणीपुरवठा विभाग आणि नगर अभियंत्यांना फैलावर घेतल्याची माहिती आहे. नव्या इमारतींचा पाणीपुरवठा बंद करण्याचा कोणताही निर्णय प्रशासनाने घेतलेला नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच पाणीपुरवठ्याबाबतची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी स्वतः अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

संभाव्य सुपर एल निनोमुळे आगामी काळात पर्जन्यमान घटण्याची आणि जलसाठ्यावर ताण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने पाणीबचतीचे नियोजन सुरू केले आहे. मात्र, या नियोजनाच्या नावाखाली वापर परवाना (ओसी) मिळालेल्या नव्या इमारतींचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी (ता. ४) समोर आली होती. त्यामुळे नव्या इमारतींमधील रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या वृत्तानंतर शहरातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर गुरुवारी आयुक्त सौरभ राव यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि नगर अभियंत्यांची बैठक घेतली.

ठाण्यात निर्णय आयुक्तांची मान्यता नसताना परस्पर कसा जाहीर करण्यात आला, असा सवाल त्यांनी केल्याचे समजते. अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे प्रशासनाचीच अडचण झाल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. या बैठकीनंतर महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात नव्या इमारतींच्या पाणीपुरवठ्याबाबत खुलासा करण्यात आला.

आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा!
नवीन आणि जुन्या इमारतींना आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा होईल, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. वापर परवाना प्राप्त इमारतींचा पाणीपुरवठा बंद करण्याबाबत कोणताही निर्णय तूर्त घेण्यात आलेला नाही, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.