

मुरबाड, ता. ६ (वार्ताहर) : साने गुरुजी लिखित ‘श्यामची आई’ हे पुस्तक म्हणजे मातृप्रेम, त्याग, संस्कार आणि जीवनमूल्यांचा अनमोल ठेवा आहे. या साहित्यकृतीतील विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भुवन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने अभिनव उपक्रम राबविला. जवळपास दीड महिना दररोज परिपाठाच्या वेळी ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे अभिवाचन करण्यात आले. त्यानंतर पुस्तकावर आधारित बहुपर्यायी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
उपक्रमांतर्गत शाळेच्या पदवीधर शिक्षिका जयश्री शेलवले यांनी दररोज पुस्तकातील एकेका रात्रीचे भावपूर्ण अभिवाचन केले. विद्यार्थीही नियमितपणे कथा ऐकून त्यांचा सारांश आणि महत्त्वाच्या नोंदी लिहून ठेवत होते. आईचे प्रेम, तिचा त्याग, कुटुंबाचे महत्त्व आणि चांगले संस्कार यांची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी, हा उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. तसेच प्रेम, सहकार्य, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांसारखी जीवनमूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पुस्तकाचे पारायण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर बहुपर्यायी प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यामध्ये आरोही लक्ष्मण म्हाडसे हिने प्रथम, अक्षरा गणेश बांगर हिने द्वितीय, तर खुशी अविनाश राऊत हिने तृतीय क्रमांक पटकावला. विधी देविदास बांगर आणि स्वरा बळीराम बांगर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. पारितोषिक वितरण सोहळ्याला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप बांगर आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.