आयुष्य घडवणाऱ्या शाळेचे ऋण विसरू नका!

आयुष्य घडवणाऱ्या शाळेचे ऋण विसरू नका!
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : बालपणी ज्या शाळेच्या वर्गखोलीत पहिल्यांदा अक्षर गिरवले, ज्या शिक्षकांनी हात धरून लिहायला शिकवले. ज्या शाळेने आयुष्याला दिशा देत स्वप्न पाहण्याचे बळ दिले, त्या शाळेचे ऋण विसरू नका. आज तुम्ही आयुष्यात कितीही मोठे झालात, कोणत्याही पदावर पोहोचलात, तरी तुमच्या यशाचा पाया रचणाऱ्या त्या शाळेसाठी यंदाच्या दिवाळीत आवर्जून काहीतरी करा, अशी हृदयस्पर्शी साद ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी जिल्हा परिषद शाळांच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींना घातली आहे.

दिवाळीनिमित्त गावी परतणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना उद्देशून यादव यांनी भावनिक आवाहन केले आहे. स्वतःही जिल्हा परिषद शाळेत शिकलेला विद्यार्थी असल्याचा अभिमान व्यक्त करत, त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. शाळेची घंटा, प्रार्थनेच्या रांगा, मित्रांसोबत केलेली धमाल, शिक्षकांचा प्रेमळ धाक आणि शाळेच्या अंगणात घालवलेले निरागस क्षण आयुष्यभर मनात घर करून राहतात. आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रांत यशस्वी झालो असलो, तरी आपल्या जडणघडणीत शाळेचा आणि शिक्षकांचा वाटा अनमोल आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सक्षम शाळा अभियानांतर्गत इमारतींचे नूतनीकरण, डिजिटल वर्गखोल्या, आधुनिक स्वच्छतागृहे, ग्रंथालये, क्रीडा सुविधा आणि शाळांचे सौंदर्यीकरण असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी मिशन भरारी आणि निपुण ठाणे यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातूनही प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या प्रयत्नांना माजी विद्यार्थ्यांची साथ मिळाली, तर शाळांचा कायापालट अधिक वेगाने होऊ शकतो, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला आहे.

आज आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत. आपल्या मुलांना ज्या सुविधा मिळत आहेत, त्याच सुविधा गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळाव्यात, ही भावना मनात ठेवून माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. शाळेला आर्थिक मदत, पुस्तके, संगणक, शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवातून मार्गदर्शन करावे. वाचन, लेखन आणि गुणवत्ता वाढीसाठीही हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शाळांच्या अडचणी समजून घ्या
आपण एकटे कदाचित संपूर्ण शाळा बदलू शकणार नाही; पण गावातील अनेक माजी विद्यार्थी एकत्र आले, तर आपल्या शाळेचे चित्र नक्कीच बदलू शकते. योगदानाची रक्कम किती मोठी आहे, यापेक्षा त्यामागची भावना मोठी असणे महत्त्वाचे आहे, या शब्दांत त्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या मनाला साद घातली आहे. गावी गेल्यानंतर आपल्या शाळेला आवर्जून भेट द्या, मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी संवाद साधा, शाळेच्या अडचणी आणि गरजा समजून घ्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.