एचएसआरपी क्रमांकफलकाकडे दुर्लक्ष

एचएसआरपी क्रमांकफलकाकडे दुर्लक्ष
Published on: 

एचएसआरपी क्रमांक फलकाकडे दुर्लक्ष
पनवेल आरटीओची चार महिन्यांत धडक मोहीम

वसंत जाधव | सकाळ वृत्तसेवा

पनवेल, ता. ६ : वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक असतानाही अनेक वाहनचालकांकडून या नियमाला केराची टोपली दाखविली जात आहे. अशा वाहनचालकांविरोधात पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने धडक कारवाई सुरू केली आहे. जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांत एचएसआरपी क्रमांक फलक नसलेल्या सुमारे चार हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, तब्बल ४० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मात्र, आकारलेल्या दंडापैकी केवळ दोन लाख रुपयांच्या आसपास वसुली झाल्याने दंडवसुलीचे आव्हानही समोर आले आहे.

पनवेल आरटीओच्या अखत्यारीत एकूण तीन लाख ९८ हजार ४२९ वाहनांची नोंदणी आहे. यापैकी एक लाख ९० हजार ४८५ वाहनांसाठी एचएसआरपी क्रमांकफलक बसविण्याकरिता नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ एक लाख ५२ हजार १६४ वाहनांवरच हे क्रमांकफलक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करूनही हजारो वाहनचालकांनी अद्याप क्रमांक फलक बसविण्याकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट होत आहे.

आकडेवारीनुसार, पनवेल आरटीओच्या एकूण वाहनसंख्येपैकी केवळ ४७.८१ टक्के वाहनांसाठी एचएसआरपी क्रमांक फलकाची नोंदणी झाली आहे. म्हणजेच निम्म्याहून अधिक वाहनांच्या बाबतीत ही प्रक्रियाच अद्याप अपूर्ण आहे. विशेष म्हणजे नोंदणी केलेल्या वाहनांपैकीही सर्व वाहनांवर प्रत्यक्ष क्रमांक फलक बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नोंदणी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील दरी कायम असल्याचे चित्र आहे.

वाहनांची सुरक्षित ओळख निश्चित करणे, वाहनचोरीच्या घटनांना आळा घालणे आणि वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता आणणे या उद्देशाने उच्च सुरक्षा क्रमांक फलक अनिवार्य करण्यात आले आहेत. मात्र, नियम लागू होऊनही वाहनचालकांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिवहन विभागाला दंडात्मक कारवाईचा आधार घ्यावा लागत आहे. चार महिन्यांत चार हजार वाहनांवर कारवाई करूनही दंडवसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याने केवळ कारवाई करून प्रश्न सुटणार की वाहनचालकांकडून नियमांची प्रभावी अंमलबजावणी होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. आगामी काळातही विनाएचएसआरपी वाहनांविरोधातील तपासणी मोहीम सुरूच राहणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

चौकट
दंडाची रक्कम ४० लाख
पनवेल आरटीओने चार महिन्यांत सुमारे चार हजार वाहनांवर कारवाई करीत ४० लाख रुपयांचा दंड आकारला. मात्र, प्रत्यक्षात केवळ दोन लाख रुपयांच्या आसपास दंड वसूल झाला आहे. दुसरीकडे, एकूण वाहनसंख्येपैकी ४७.८१ टक्के वाहनांसाठीच एचएसआरपीची नोंदणी झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांची उदासीनता आणि दंडवसुलीतील कमी प्रमाण ही आरटीओसमोरील दुहेरी आव्हाने ठरत आहेत.

कोट :

एचएसआरपी क्रमांक फलक बसविणे वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. वाहनचालकांनी दंडात्मक कारवाईची वाट न पाहता अधिकृत संकेतस्थळावरून तातडीने नोंदणी करून क्रमांक फलक बसवून घ्यावेत. नियमांचे पालन करावे. विनाक्रमांक फलक वाहनांविरोधातील तपासणी आणि कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.
- सूरज पवार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.