मेट्रोच्या श्रेयावरून भिवंडीत राजकीय फटाके

मेट्रोच्या श्रेयावरून भिवंडीत राजकीय फटाके
Published on: 

भिवंडी, ता. ६ (वार्ताहर) : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. मात्र, या प्रकल्पाची सर्वप्रथम मागणी करून त्यासाठी पाठपुरावा केल्याचे श्रेय मी नक्कीच घेणार. न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची माझी सवय नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि भिवंडीतील भाजप आमदार महेश चौघुले यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. मेट्रोच्या श्रेयावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चेला त्यांनी यानिमित्ताने उत्तर दिले.
ठाणे ते भिवंडी १२ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मागील आठवड्यात या मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर मेट्रोसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे कपिल पाटील यांनी धामणकर नाका, अंजूरफाटा, पूर्णा आणि काल्हेर येथील मेट्रो स्थानकांना भेटी देऊन कामांचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मेट्रो प्रकल्पाच्या अधिकारी योजना पाटील, नगरसेवक सुमित पाटील, सभापती ॲड. वैभव भोईर, स्थानिक भाजप पदाधिकारी श्रीधर पाटील, छत्रपती पाटील, हरिश्चंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य विनोद मुकादम, माजी सरपंच सीताबाई पाटील, राजेंद्र भोईर, स्नेहा पाटील, राहनाळचे सरपंच प्रताप पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. काल्हेर मेट्रो स्थानकात समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.

मेट्रो मार्ग क्रमांक ५ चा विस्तार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ५ अ या प्रकल्पाच्या माध्यमातून उल्हासनगर आणि अंबरनाथपर्यंत केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी मेट्रो मार्ग ५ आणि ५ अ यांचे श्रेय खासदार शिंदे यांना देत आहेत. तर भिवंडीतील आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांकडूनही बॅनरबाजी करून या प्रकल्पाचे श्रेय त्यांना दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर कपिल पाटील यांनी २०१८ मधील भूमिपूजन सोहळ्याची आठवण करून दिली. कल्याण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग ५ चे भूमिपूजन झाले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन खासदार म्हणून आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प सुरू झाल्याचे जाहीरपणे सांगितले होते, असा दावा पाटील यांनी केला. त्या सोहळ्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते, तर मग कल्याणपर्यंतच्या मेट्रोचे श्रेय ते कसे घेऊ शकतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
''मी न केलेल्या कामाचे श्रेय घेत नाही. त्यामुळे मेट्रो मार्ग ५ चे संपूर्ण श्रेय मी कधीच घेणार नाही. मात्र, ज्या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला, तो माझ्या प्रयत्नांमुळे मार्गी लागत असल्याची माहिती जनतेला आहे. अशा कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे हा बालिशपणा आहे,'' अशी टीका पाटील यांनी केली.
दरम्यान, दिवाळीचे फटाके फुटण्याआधीच ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या श्रेयावरून राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात झाली असून, आगामी काळात हा वाद आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.

मेट्रो प्रकल्पात केंद्राचा सहभाग महत्त्वाचा
मेट्रो प्रकल्प राज्य सरकारचा असल्याने आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांकडूनही त्याचे श्रेय त्यांना दिले जात असल्याबाबत पाटील यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेकडे लक्ष वेधले. देशातील कोणताही मेट्रो प्रकल्प केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय साकारता येत नाही. मेट्रो मार्ग ५ साठी सुरुवातीला केंद्र सरकारकडून २० टक्के निधी मिळणार होता; मात्र, नंतर शासकीय प्रक्रियेत तो समाविष्ट झाला नाही. त्यामुळे हा केंद्र सरकारचा प्रकल्प नाही, असा निष्कर्ष काढता येणार नाही, असे ते म्हणाले. केंद्र सरकारकडून उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयासमोर उभे राहून छायाचित्रे का काढता, असा सवालही त्यांनी आमदार चौघुले यांचे नाव न घेता केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.