

आजारी ‘माया’च्या मदतीला अनंत अंबानींची ‘वनतारा’
केरळहून हवाई मार्गाने जामनगरमधील उपचार केंद्रात दाखल
सकाळ वृत्तसेवा
जामनगर, ता. ६ : केरळमधील मलयाट्टूर वन विभागाच्या कप्रीक्काड परिसरात जन्मत:च आई आणि कळपापासून दुरावलेल्या, वन कर्मचाऱ्यांच्या मायेच्या सावलीत वाढलेल्या १८ महिन्यांच्या ‘माया’ या हत्तीच्या पिल्लाची मृत्यूशी झुंज सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बागडताना पडल्याने पुढच्या दाेन्ही पायांची हाडे मोडल्याने तिला उभे राहणेही कठीण झाले आहे. मायाच्या असह्य वेदनांवर फुंकर घालून नवसंजीवनी देण्यासाठी अनंत अंबानी यांच्या ‘वनतारा’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. तिला केरळमधून हवाई मार्गाने शुक्रवारी (ता. ६) गुजरातमधील जामनगर येथील वनताराच्या अतिदक्षता उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली तिच्यावर अहोरात्र उपचार करण्यात येणार आहेत.
केरळचे मुख्य वन्यजीव संरक्षक डॉ. पी. पुगाझेंडी (आयएफएस) यांनी दिलेल्या स्थलांतराच्या आदेशानंतर ६ नोव्हेंबरला मायाला विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे जामनगर येथे दाखल करण्यात आले आहे. केरळमधील मलयाट्टूर वन विभागाच्या कप्रीक्काड परिसरात १९ एप्रिल २०२५ रोजी हत्तीचा कळप नदी ओलांडून पुढे गेल्याने नदीकिनारी हे हत्तीचे पिल्लू एकटेच आढळले होते. आईचे पहिले दूधही न मिळाल्याने ते अशक्त बनले हाेते. तिच्या शरीरातील पाणीही कमी झाले हाेते. अशा अवस्थेत केरळ वन विभागाचे सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बिनॉय सी. बाबू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिची जबाबदारी स्वीकारली. वर्षभराहून अधिक काळ त्यांनी दिवस-रात्र तिची देखभाल केली. तिला नियमित दूध पाजणे, औषधोपचार करणे आणि तिची काळजी घेणे असे काम अविरत सुरू होते. त्यांनी तिचे माया असे नामकरण केले. जुलै २०२६ मध्ये बागडताना अचानक मायाचा पाय घसरून तिच्या पुढच्या पायांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिच्यावर फिजिओथेरपी, स्प्लिंट्स आणि विविध पूरक औषधोपचार करण्यात आले. उपचारांदरम्यान तिची हाडे अधिकच कमकुवत झाली. ऑक्टोबरच्या अखेरीस तिची प्रकृती आणखी खालावली. पुढच्या दोन्ही पायांची हाडे फ्रॅक्चर झाल्याने ती उभी राहू शकत नव्हती. त्याचबरोबर छातीतील संसर्गही झाला. अशा स्थितीत दीर्घकाळ एकाच स्थितीत पडून राहिल्याने तिच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या.
मायाची गंभीर अवस्था पाहून तिला वाचविण्यासाठी उपचारांचे सर्व पर्याय तपासण्याचा निर्णय केरळच्या मुख्य वन्यजीव संरक्षकांनी घेतला. त्यासाठी त्यांनी देशातील नामवंत हत्ती तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. प्रख्यात हत्ती पशुवैद्यक पद्मश्री डॉ. कुशल कोन्वर सरमा यांनी मायाच्या आजाराचे परीक्षण करून तिच्या शरीरातील पॅराथायरॉइड ग्रंथीशी संबंधित विकार असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यांनी योग्य उपचारांद्वारे या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य होऊ शकते, असे निदान केले. सरमा हे वनतारा संस्थेचे पशुवैद्यकीय सल्लागार आहेत. त्यांच्या मताशी वनताराच्या एलिफंट केअर सेंटरचे प्रमुख पशुवैद्यक डॉ. यदुराज खडपेकर यांनी सहमती दर्शविली. त्यानंतर वैद्यकीय मंडळाने एकमताने मायाला बरे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.
वनताराच्या वतीने मायाला जामनगरला आणण्यासाठी विशेष वैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेल्या हवाई रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. या प्रवासात वनताराचे तीन हत्ती पशुवैद्यक, पशुवैद्यकीय सहाय्यक आणि देखभाल करणारे कर्मचारी यांच्यासह केरळमध्ये सुरुवातीपासून तिची काळजी घेणारे डॉ. बिनॉय सी. बाबू आणि तिची काळजी घेणारे निखिल बाबू हेही हाेते. उपचारांच्या संपूर्ण कालावधीत निखिल बाबू तिच्यासाेबत राहणार आहेत. वनताराच्या रुग्णालयात मायावर चोवीस तास देखरेख ठेवण्यात येणार आहे. तिच्या वेदना कमी करण्यासाठी विशेष उपचार, अत्याधुनिक वैद्यकीय तपासण्या, तिला उचलण्याची हायड्रॉलिक यंत्रणेची सुविधा आणि प्रकृतीनुसार जलोपचार (हायड्रोथेरपी) करण्यात येणार आहेत. तिच्या हाडांची स्थिती, संसर्ग आणि एकूण शारीरिक आरोग्य यांचे नियमित निरीक्षण केले जाणार आहे. उपचारादरम्यान तिच्या प्रकृतीत होणाऱ्या बदलांनुसार पुढील उपचारपद्धती निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, मायाची जबाबदारी केरळ वन विभागाकडेच राहणार असून, उपचार पूर्ण झाल्यानंतर वनतारा तिला केरळमधील अभयारण्यात परत पाठविण्याची व्यवस्था करणार आहे.
मायाची प्रकृती अद्याप गंभीर असून, तिच्या उपचारांबाबत निश्चित अंदाज व्यक्त करणे शक्य नाही. तिच्यासमोरील आव्हाने मोठी आहेत, मात्र या कठीण प्रवासात आता ती एकटी नाही. तिच्या जगण्याची आशा कायम ठेवण्यासाठी वनताराचे तज्ज्ञ पथक सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
----
मायाने आयुष्यातील प्रत्येक दिवस जगण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. आता तिच्यासाठी आम्ही संघर्ष करू. आमचे पथक तिची एका क्षणासाठीही साथ सोडणार नाही. या चिमुकल्या जीवासाठी सर्वांनी प्रार्थना करावी. प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे आणि मायाचे अस्तित्वही आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.
- विवान करणी, मुख्य कार्यकारी अधिकारी, वनतारा
----
वनतारा काय करते?
गुजरातमधील जामनगर येथे मुख्यालय असलेली ‘वनतारा’ ही संस्था वन्यजीवांचे बचावकार्य, उपचार, कल्याण आणि संवर्धन यासाठी जागतिक स्तरावर कार्यरत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. प्रगत पशुवैद्यकीय औषधोपचार, विशेष पायाभूत सुविधा आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या एकत्रित मदतीने वनतारा प्राण्यांचे बचावकार्य, उपचार, पुनर्वसन आणि आजीवन देखभाल करते. नैसर्गिक अधिवासाबाहेर प्राण्यांचे संवर्धन, उपचारानंतर योग्य परिस्थितीत त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे, तसेच स्थानिक प्रजातींचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. याशिवाय मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठीही विविध उपक्रम राबविले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.