पूर्णेकर हत्या प्रकरणावरून आगरी-कोळी समाज आक्रमक

पूर्णेकर हत्या प्रकरणावरून आगरी-कोळी समाज आक्रमक
Published on: 

भिवंडी, ता. ६ (वार्ताहर) : क्लस्टर योजनेला विरोध केल्यामुळे प्रदीप पूर्णेकर यांची हत्या केल्याचा आरोप करत आगरी-कोळी भूमिपुत्र समाजाने भिवंडी तालुक्यातील राहनाळ येथे श्रद्धांजली व निर्धार सभा घेतली होती. ‘आपली गावठाणे घशात घालण्याचा प्रकार नगरविकास विभागाच्या माध्यमातून सुरू आहे,’ असा आरोप उरण येथील ओबीसी समाजाचे नेते राजाराम पाटील यांनी केला. अन्यायाविरोधात संघटितपणे लढण्याचा निर्धारही या वेळी व्यक्त करण्यात आला.
राहनाळ येथील आगरी समाज सभागृहात बुधवारी ही सभा पार पडली. या वेळी आगरी समाजाचे अध्यक्ष नामदेव पाटील, भगवान ठाकूर, अरुण पाटील, ॲड. भारद्वाज चौधरी, भारत पाटील, विनोद पाटील, मनोहर पाटील, यशवंत पाटील, सुनील पाटील आणि नलिनी चौधरी उपस्थित होते.
आगरी-कोळी भूमिपुत्र समाजाची ओळख देशाचे रक्षण करणारा समाज अशी आहे. मूळ भूमिपुत्र असल्याचे शेकडो पुरावे उपलब्ध असतानाही मीनाक्षी शिंदे यांच्याकडून या समाजाचा अवमान केला जात असल्याचा आरोप राजाराम पाटील यांनी केला. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येतील मारेकरी भाडोत्री गुंड होते; मात्र ही हत्या घडवून आणणारे अद्याप मोकाट असल्याचा दावा त्यांनी केला. समाजाने आत्मविश्वास गमावून न बसता अन्यायाविरोधात लढण्याची प्रतिज्ञा करणे, हीच दिवंगत पूर्णेकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले. पूर्णेकर कुटुंबीयांवरील अन्याय थांबवावा. भूमिपुत्र समाजावर अन्याय झाल्यास तो सहन केला जाणार नाही, असा निर्धार सभेचे आयोजक अरुण पाटील यांनी व्यक्त केला.
पूर्णेकर यांची हत्या कोणत्या कारणासाठी झाली, याबाबत तपास यंत्रणा स्पष्ट भूमिका मांडत नसल्याने पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा आरोप ॲड. भारद्वाज चौधरी यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.