

२५ वर्षांचा पाणीपट्टीचा तिढा सुटणार
भिंगार ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश
पनवेल, ता ८ (बातमीदार) : पनवेल तालुक्यातील भिंगार ग्रामपंचायतीचा गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीपट्टीचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच अशोक राजाराम गायकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पाणीपट्टीपोटी ९५ लाख १९ हजार ८३६ रुपयांचा धनादेश नुकताच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यकारी उपअभियंत्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
भिंगार ग्रामपंचायत हद्दीतील घरांमध्ये पाण्याचे मीटर नसल्याने पाणीपट्टीची नियमित वसुली करण्यात अडचणी येत होत्या. परिणामी थकबाकी आणि दंडाची रक्कम वाढत जाऊन एकूण देयक तब्बल पाच कोटी ३१ लाख ५६ हजार ४५६ रुपयांवर पोहोचले होते. या थकबाकीमुळे ग्रामपंचायतीसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रभारी सरपंच अशोक गायकर यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून ९५ लाख १९ हजार ८३६ रुपये अदा करण्याची कार्यवाही पूर्ण झाली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत धनादेश सुपूर्द करण्यात आला. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीपट्टीच्या प्रश्नाच्या सोडवणुकीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, सुभाष पाटील, अनिल वरे, अजिंक्य वाघ, करीना पाटील, रीना पाटील, शामल लहाने, सुप्रिया गायकर, उज्वला वाघमारे, आशा वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.