एफडीएच्या धडक कारवाईचा मिठाई विक्रीला फटका!

एफडीएच्या धडक कारवाईचा 
मिठाई विक्रीला फटका!
Published on: 

पनवेल, ता. ८ (बातमीदार) : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेसळविरोधी धडक कारवाईचा परिणाम यंदा दिवाळीच्या मिठाई बाजारपेठेवर झाल्याचे पनवेल परिसरात पाहायला मिळाले. दरवर्षी दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मिठाईच्या खरेदीकडे यंदा ग्राहकांनी काहीशी पाठ फिरवली असून, मिठाईऐवजी सुक्या मेव्याला अधिक पसंती दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, बेदाणे, अंजीर, खारीक आणि खजूर यांसारख्या सुक्या मेव्याच्या विक्रीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत सर्वसामान्य ग्राहकांमध्येही जागरूकता निर्माण झाली. दिवाळी आणि मिठाई हे समीकरण अनेक वर्षांपासून कायम आहे. दिवाळीच्या फराळासोबतच नातेवाइकांना, मित्रपरिवाराला आणि व्यावसायिक संपर्कातील व्यक्तींना मिठाईचे डबे भेट देण्याची परंपरा आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात मिठाईच्या दुकानांमध्ये मोठी उलाढाल होते. मात्र, मिठाईमध्ये होणारी भेसळ, निकृष्ट दर्जाचे घटक आणि आरोग्याला होणारे संभाव्य दुष्परिणाम याबाबत अलीकडच्या काळात अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

यंदा तुकाराम मुंढे यांनी भेसळविरोधात उघडलेली मोहीम, विविध कारवाया आणि पत्रकार परिषदांसह जनजागृतीच्या माध्यमातून दिलेले संदेश यामुळे ग्राहक अधिक सजग झाल्याचे दिसून आले. मिठाई खरेदी करताना तिचा दर्जा, गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत ग्राहकांनी अधिक काळजी घेतली. परिणामी पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करण्याऐवजी अनेकांनी पर्यायी पदार्थांना प्राधान्य दिले.

पनवेलमधील मिठाई विक्रेत्यांनाही या बदलाचा अनुभव आला. दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मिठाईचा साठा करून ठेवला जातो. यंदा मात्र ग्राहकांचा कल लक्षात घेऊन काही दुकानदारांनी मिठाईचा साठा मर्यादित ठेवल्याचे चित्र होते. अपेक्षेप्रमाणे विक्री न झाल्याने मिठाई व्यवसायावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचेही दिसून आले.

आकर्षक डब्यांना मागणी
काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, बेदाणे, अंजीर, खारीक आणि खजूर यांची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला. विशेषतः दिवाळी भेटवस्तू देण्यासाठी आकर्षक पद्धतीने तयार केलेल्या सुक्या मेव्याच्या डब्यांना मागणी होती. काही ग्राहकांनी किरकोळ दुकानांऐवजी थेट मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ गाठून घाऊक दरात सुकामेवा खरेदी करण्यास पसंती दिली.

यंदा दिवाळीत मिठाईच्या खरेदीपेक्षा सुक्या मेव्याला ग्राहकांची अधिक पसंती मिळाली. भेसळविरोधी कारवायांमुळे ग्राहक गुणवत्ता आणि सुरक्षेबाबत जागरूक झाले आहेत. त्यामुळे काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांसह आकर्षक सुकामेवा भेटसंच मागणीत वाढ झाली आहे.
- गौरव गव्हाणे, सुक्या मेव्याचे व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.