गोठिवलीचा खदान तलाव विद्युत रोषणाईने उजळला

गोठिवलीचा खदान तलाव विद्युत रोषणाईने उजळला
Published on: 

गोठिवलीत दीपोत्सवाचा झगमगाट
शेतकऱ्यांना मदतीचा हात
वाशी, ता. ८ (बातमीदार) : आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी आकाशकंदील, नयनरम्य सजावट आणि पारंपरिक रांगोळ्यांनी उजळलेला भारतरत्न स्व. राजीव गांधी (खदान तलाव) परिसर... अशा उत्सवी वातावरणात गोठिवली नगरीत ‘प्रकाशमयी दीपोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवी मुंबई जिल्हा युवासेनेच्या वतीने आयोजित या दीपोत्सवाचे उद्घाटन खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला हजारो नागरिकांनी कुटुंबीयांसह उपस्थिती लावत दिवाळीचा आनंद लुटला.

नवी मुंबईतील प्रमुख तलावांपैकी एक असलेल्या खदान तलाव परिसराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. रंगीबेरंगी आकाशकंदील, आकर्षक सजावट आणि रांगोळ्यांमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला. गोठिवली, तळवली नाका, घणसोली परिसरातील आबालवृद्धांनी मोठी गर्दी केल्याने दीपोत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.

या सोहळ्यात सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्शही पाहायला मिळाला. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रभाग क्रमांक ७ मधील चार नगरसेवकांनी आपले तीन महिन्यांचे मानधन मदतनिधीसाठी देण्याची घोषणा केली. नगरसेविका मंदाकिनी रमाकांत म्हात्रे, नगरसेवक अनिकेत रमाकांत म्हात्रे, नगरसेविका अनिता सुरेश मानवतकर आणि नगरसेविका चैताली भावेश पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाचे उपस्थितांनी स्वागत केले. दिवाळीचा आनंद साजरा करताना संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याच्या या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.

माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपोत्सवाचे नियोजन करण्यात आले. या वेळी ऐरोली विधानसभा जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, रोहिदास पाटील, सरोज पाटील, जयदीप नामदास, भावेश पाटील आणि सुरेश मानवतकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

युवासेनेचे जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे यांनी नागरिकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक परंपरा जपणे, तसेच शेतकऱ्यांच्या मदतीतून सामाजिक बांधिलकी जोपासणे हा दीपोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.